‘होणार सून मी या घरची’ मालिकेचे भविष्यात ‘सिक्वेल’ येण्याचे सूतोवाच
गेली दोन वर्षे छोटय़ा पडद्यावर ठाण मांडून असणाऱ्या ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील ‘श्री’ आणि ‘जान्हवी’ या जोडप्याच्या बाळाचे इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आगमन झाले आहे. साडेसातशे भागांचा टप्पा पार केलेली ही मालिका बाळाच्या बारशाचा समारंभ करून ‘झी मराठी’ वाहिनीवरून २३ जानेवारी रोजी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मात्र, मराठी मालिकांच्या इतिहासात या मालिकेला आणि विशेषत: श्री-जान्हवी या जोडीला न भूतो न भविष्यती अशी प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे या वळणावर ही मालिका संपत असली तरी भविष्यात त्यांच्या बाळाची पुढची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते, असे संकेत दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली होती. सातत्याने टीआरपीच्या खेळात पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या या मालिकेमुळे अनेक दंतकथा, विनोदांना जन्म दिला. या मालिकेची मध्यवर्ती जोडी असलेल्या श्री (शशांक केतकर) आणि जान्हवी (तेजश्री प्रधान) या जोडीला आजवर कोणत्याच मालिकांमधील जोडीला मिळाली नाही एवढी अमाप प्रसिद्धी मिळाली. जान्हवी आणि तिच्या सहा सासवा, त्यांच्यातले बदलत गेलेले नातेसंबंध, जान्हवीचे ‘काहीही हं श्री’ सारखे भन्नाट संवाद, शशिकलाबाईंचा (जान्हवीची आई) खाष्ट स्वभाव आणि तिच्या वडिलांचा समंजसपणा, पिंटय़ा-त्याचे सुनीताशी झालेले लग्न आणि मग जान्हवीचे लांबलेले बाळंतपण या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात घर केले.
प्रत्येक चांगल्या गोष्टीला जशी सुरुवात असते तसाच त्याचा शेवटही चांगला झाला पाहिजे. त्यामुळे ही मालिका कधीच संपू नये अशी प्रेक्षकांची इच्छा असतानाच श्री-जान्हवीच्या बाळाबरोबर ही मालिका प्रेक्षकांना एक हुरहुर लावून संपणार आहे. मालिकांच्या इतिहासात या मालिकेला प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळाला तो आजवर दुसऱ्या कोणत्याही मालिकेला मिळालेला नाही.
‘श्री व जान्हवी’ ही जोडी छोटय़ा पडद्यावरची अजरामर जोडी ठरली आहे. मालिका आता संपत असली तरी मालिकेचे पुढे काय करायचे? हे अजून नक्की ठरविलेले नाही. पण भविष्यात कदाचित प्रेक्षकांना या मालिकेचा ‘सिक्वेल’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे, असेही देवस्थळी म्हणाले.