संजय लीला भन्साली दिग्दर्शित मुहूर्तापासूनच बहुचर्चित अशा ‘पद्मावती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर म्हणजे अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि कथादृष्ट्या अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटातील नायिकांच्या व्यक्तीमत्व आणि सौंदर्य यांचा लक्षवेधक ठसाच होय. ‘पद्मावती’ च्या पूर्वप्रसिध्दीला सुरुवात करतानाच त्याच्या पहिल्याच पोस्टर डिझाईनवरील अनेक तरी उंची सौंदर्य अलंकार , दागिने यानी अधिकच देखणी ठरलेल्या दीपिका पादुकोणच्या दर्शनाने ते अधिकच अधोरेखित केले आहे. दीपिकाच्या नैसर्गिक अथवा स्वाभाविक देखण्या- दिलखुलास व्यक्तिमत्वाने या हिरेजडीत व शालीन वस्राला अधिकच गोडवा दिला आहे.

अशा प्रकारे अभिनेत्रीचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि अशी सौंदर्यीकरणाची सकारात्मक संधीची देखिल एक छानशी देखणी परंपरा आहे. त्यात आवर्जून नावे घ्यायची तर के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’च्या पोस्टरवरील ‘प्यार किया तो डरना क्या…’ या सभोवारच्या काचमहालातील मधुबालाचे शृंगारिक रुपडे व तिच्या त्या एक्स्प्रेशनमध्ये व्यक्त होणारे सलिमवरचे ( दिलीपकुमार) प्रेम आणि त्याच्या पित्याला म्हणजेच अकबरला ( पृथ्वीराज कपूर) त्याच आपल्या प्रेमाची जाणीव करून दिलेली अदा देखिल स्पष्ट दिसते. मधुबालाच्या नैसर्गिक सौंदर्याने अनारकलीला पोस्टरवर अधिकच खुलवले.

अशा प्रकारे अभिनेत्रींच्या व्यक्तिमत्वात त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा एकरुप होणे व त्याचा पोस्टवर प्रत्यय येणे हे कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’ (मीनाकुमारी) आणि रझिया सुल्तान (हेमा मालिनी) या चित्रपटांच्या वेळीही घडले. मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘उमराव जान’ (रेखा) देखील महत्त्वपूर्ण. याच भूमिकेसाठी रेखाला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावरुन याचे महत्व स्पष्ट होते. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’ची जोधा (ऐश्वर्या) हे देखिल उल्लेखनीय उदाहरण. ऐश्वर्या ने ‘विश्व सुंदरी’चा मुकुट जिंकला व ती मॉडेल असल्याने तिची प्लॅस्टिक ब्युटी ऐतिहासिक व्यक्तिरेखाना न्याय देणार नाही अशा चर्चेला ऐश्वर्याने अशा रुपांतून छान उत्तर दिले. लीला भन्सालीने त्यात सातत्य ठेवलयं. ‘हम दिल दे चुके सनम’ मधील नंदीनी अर्थात ऐश्वर्या राय आणि शरदचंद्र चॅटर्जी यांच्या ‘देवदास’ कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटातील पारो (ऐश्वर्या) व चंद्रमुखी (माधुरी दीक्षित) यानी ही अभिनेत्रींच्या पोस्टर सौंदर्य परंपरेला आणखीनच ग्लॅमरस केले. ही रुपडे पाहूनच हे चित्रपट पाह्यला हवेत असेच फर्स्ट इम्प्रेशन पडले व तेच फायनल इम्प्रेशन ठरले हे विशेषच. येथे (देखील) दिग्दर्शक दिसतो असेही म्हणता येईल. संजय लीला भन्सालीच्याच ‘बाजीराव मस्तानी’ने याच वैशिष्ट्यपूर्ण वाटचालीला आणखीन वेधक केले. आता सोशल नेटवर्किंग साइट्सचा काळ असल्याने तर काही क्षणातच मस्तानी (दीपिका) व काशीबाई (प्रियांका चोप्रा) यांच्या भरजरीत रुपाचे कौतुक व तुलना होऊ लागली. दोघींच्याही चाहत्यांकडून हे प्रेम व्यक्त होऊ लागले. दोघी मुळात देखण्या आणि त्यात त्याना अशी छानच सजायची संधी मिळताच त्या खुलल्या.
‘पद्मावती’ची दीपिका या देखण्या आकर्षक वाटचालीतील अधिकच मोहक उदाहरण ठरलंय.