बॉलिवूड पार्श्वगायक सोनू निगम याने भारत इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्यासाठीचे प्रेरणादायी गाणे गायले आहे. केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी सोनूच्या आवाजातील गाण्याचे आयटीबीपी मुख्यालयात अनावरण केले. सोनू निगमने गायलेले देशभक्ती गीत हे सव्वा दोन मिनिटांचे असून, ‘हम सरहद के सेनानी, हम सच्चे हिंदुस्तानी है! असे या गीताचे शब्द आहेत.  आयटीबीपीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे गाणे काही वर्षांपूर्वी लिहिलेले आहे. परंतु, आता हे गाणे नव्या व्हर्जनमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. सोनू निगमने या गाण्याला आवाज द्यावा, असे आयटीबीपीतील नव्वद हजार जवानांना वाटत होते. जवानांची ही इच्छा सोनूने कोणत्याही अटीशिवाय पूर्ण केली. हे गाणे गाण्यासाठी कोणतेही मानधन घेतले नाही.

या गाण्यातून जवानांच्या कामकाजाचे वर्णन करण्यात आले आहे. या गीतामध्ये जवानांना ‘हिमवीर’ अर्थात हिमालयातील योद्धा अशी उपमा देण्यात आली आहे. आयटीबीपी दलाची निर्मिती ही चीनला लागून असलेल्या सीमा सुरक्षिततेसाठी करण्यात आली आहे. याशिवाय हे दल पॅरामिलिटरी फोर्स अंतर्गत सुरक्षिततेसंदर्भातही विशेष मोहिमेत सहभागी होत असते. सोनूच्या आवाजातील व्हिडिओ गाण्यामध्ये आयटीबीपी सीमेवरील छावणी देखील दाखवण्यात आली असून, जवान देखील दिसतात. हे गीत आयटीबीपीच्या खास कार्यक्रमात दाखवण्यात येईल.