लहान मुलांना ‘संगोपन’ याअंतर्गत ‘खोटे बोलू नये’ ही शिकवण, हा संस्कार अगदी प्रामुख्याने, आग्रहाने आणि थेट दिला जातो. सत्याग्रहाचा हा बाणा मुलांनी अंगी बाळगावा असं बहुतांश (स्वत: तो न बाळगणाऱ्या) पालकांना वाटत असतं.

‘खरं’ बोलण्याला आणि ‘खोटं’ न बोलण्याला एक प्रकारची नैतिक छटा जोडली गेलेली आहे. जवळजवळ आपण सगळेच कधी ना कधी खोटं बोललो असू.. बोलत असू. त्यामागचं कारण, भूमिका, उद्दिष्ट काहीही असो; पण खोटय़ाची कास किमान एकदा तरी आपण धरलेली आहे, हे खरं!

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
mumbai businessman cheated for rupees 22 lakhs, lure of secret gold
गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

‘खोटं बोलणं’ म्हणजे असं म्हणणं- ज्यामागचं कारण आणि उद्दिष्ट ‘नसलेलं’ काहीतरी ‘आहे’ म्हणून सादर करणं, हे असतं.  जे खरं नाही, पण त्यावर समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसवण्यासाठी ते खरं भासवण्याचा खटाटोप म्हणजे खोटं बोलणं. काही लोक तुरळक प्रमाणात खोटं बोलतात, तर काही मनोविकारसदृश! काही अतिमहत्त्वाच्या बाबतीत, तर काहीजण अपरिणामकारक बाबतीत असत्य बोलणं अवलंबतात. संशोधक डॉ. बेल्ला डीपॉलो यांच्या संशोधनाद्वारे हे स्पष्ट झालेलं आहे की, लोक प्रतिदिनी पाचपैकी किमान एक वेळ तरी खोटं बोलतात. या खोटं बोलण्यामागील नैतिक-अनैतिक वाद आपण क्षणभर बाजूला सारला आणि त्यामागील मानसशास्त्रीय कारणं शोधण्याचा प्रयत्न केला तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील; ज्यांचा अनुभव आपण स्वत: कळत-नकळत घेतलेला आहे. सुरुवात या स्वीकारापासून करू की, आपण खोटं बोलतो आणि त्याचा आपल्या जीवनवर्तुळाच्या घटकांवर परिणाम होतो.

बऱ्याचदा आपण आपली बाजू मांडताना ‘जे घडलं’ ते पूर्णस्वरूप सांगण्यापेक्षा आपली छबी न्यायी भासेल अशा स्वरूपाचं अर्धवट कथन करतो. म्हणजे सत्य परिस्थितीपेक्षा समोरच्या व्यक्तीने काय ऐकावं हे आपलं आपणच ठरवून आपलं कथन आणि त्यातील मजकूर तसा वळवतो. म्हणजे खरं तर आपण आपली ‘दिसणारी’ भूमिका आणि त्यावरील समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया या दोन्हींचं नियंत्रण स्वत:कडे ठेवतो. आपण बऱ्याचदा मुद्दामहून महत्त्वाचे मुद्दे, घडामोडी, उद्गार गाळतो, दडवतो आणि जे व्यावहारिकदृष्टय़ा ‘योग्य’ भासेल किंवा लोक स्वीकारतील तितकीच माहिती पुढे आणतो. तर कधी अतिशयोक्तीचाही आधार घेतो. आपल्या कमतरता लपवण्यासाठी, अपराधीपणाची भावना यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी, ती दूर करण्यासाठी, स्वरक्षणासाठी किंवा बऱ्याचदा परिणामांच्या भीतीने आपण सत्य दडवतो. सत्य सांगितल्यास लोक काय म्हणतील, आपल्याबद्दल काय विचार करतील, साथ सोडतील की काय, आपल्या जीवनाची कोणती बाजू त्यांच्यासमोर येईल, या भीतीने आपण वेळ मारून न्यायला, परिणाम पुढे ढकलायला खोटं बोलतो. आणि ही भीती कमी होण्यापेक्षा वाढतच जाते. बरेच लोक कुटिल हेतूने इतरांचे विचार आणि त्यांच्या भावना, वागणूक विशिष्ट प्रकारे, बहुतांश वेळा आपल्या फायद्याच्या दिशेने वळवण्यासाठी खोटंनाटं बोलतात. आपल्या समर्थकांची फौज उभी करण्यासाठीही लोक खोटं बोलतात. पैसा, मानसन्मान, सत्ता, प्रेम, प्रतिष्ठा आदी मिळवण्यासाठी लोक खोटं बोलतात, सत्य दडवतात. चहाडय़ासत्राचा भाग होण्यासाठीही लोक खोटंनाटं बोलतात. अफवा पसरवतात. याबरोबरीनेच गंमत म्हणून, इतरांना दुखवू नये म्हणून, इतरांचं नुकसान वाचवण्यासाठी, त्यांना लाभ व्हावा म्हणून, नातं टिकावं म्हणून, व्यवहार सुरू राहावा म्हणूनही लोक खोटं बोलतात. काही लोक इतरांची प्रतिष्ठा, पैसाअडका, पत यांना शह देण्यासाठी खोटं बोलतात; तर काही स्वत:च्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्वार्थापोटी!

थोडक्यात, धादांत खोटं बोलणं, अर्धवट सत्य पुढे आणणं, महत्त्वाच्या वा नेमक्या गोष्टी सहेतुक दडवणं वा गाळणं या सर्वाचं स्वरूप काही अंशी भिन्न असलं तरीही त्यांचा अवलंब केल्यास त्यांचे होणारे परिणाम, घेतले जाणारे निर्णय, परिस्थितीत आणि व्यक्तींच्या मानसिकतेत होणारे बदल हे चुकीच्या, कपोलकल्पित व अपूर्ण माहितीवर आधारित असतील, हे निश्चित. ही स्थिती मग वस्तुस्थिती म्हणता येईल का? शंका आहे! एकदा का खोटं बोललं गेलं की ते त्वरित किंवा कालांतराने समजेल वा न समजेल; परंतु काही परिस्थितींमध्ये एखाद्या व्यक्तीचं खोटं बोलणं पकडलं गेलं, तर त्याच व्यक्तीने सत्यरूपी उच्चारलेल्या इतर खऱ्या विधानांवरचाही विश्वास नाहीसा होण्याचा संभव असतो. कधी कधी तर त्या व्यक्तीला सामाजिक किंवा कायद्याचं कडक शासनही भोगायची वेळ येऊ शकते. अशा व्यक्तींबद्दल, त्यांच्या मानसिकतेबद्दल, त्यांच्या निर्णय-कृतींबद्दल विश्वसनीय ग्वाही देणं कठीण होऊन बसतं. खोटं बोलण्याचं सत्र आपण सफाईने, पकडले न जाता आजपर्यंत सुरू ठेवलं असेलही, त्यातून हवं ते सर्व मिळवलं- लुबाडलं असेलही, पण ही एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की आजपर्यंत शासन व दुष्परिणाम चुकवले हे पुढेही असे सुरक्षितच राहू याची ग्वाही देत नाही. आणि नजीकच्या फायद्यासाठी, प्रदीर्घ काळात होणाऱ्या संभाव्य नुकसानास आपण तयार आहोत का? म्हणजेच अजून किती काळ व कुठवर ही कार्यपद्धती अवलंबणार आहोत? नेहमीच्या खोटेपणाच्या अवलंबनाने, खऱ्याचा शोध घेण्यासाठी लागणारं धैर्य- धाडस- संयम- ज्ञान आपण कधी विकसित करू शकणार आहोत का? ‘लांडगा’ आला असे इतरांना भासवून, घाबरवून, खरेच एक दिवस लांडगा आला, तर आपली गतल काय होईल.. याचा विचार केला आहे का?

‘Noble lies’  हासुद्धा एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे, यात दुमत नाही. म्हणजे न्याय व सुव्यवस्था राखली जावी, सामाजिक संरक्षण अबाधित राहावं म्हणून पुढे आणलं गेलेलं सत्य (त्यांतील निवडक बाबी), लोकहितार्थ दृष्टिकोनातून केवळ उल्लेखले- उच्चारले- उद्गारले व अवलंबले गेलेले मोजके सत्य हेही महत्त्वाचं. पण आपण चर्चा करीत आहोत ती स्वार्थी आणि इतरांना हानी- नुकसान- अस्थैर्याला सामोरं जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी बोलल्या गेलेल्या असत्याची, सहेतुक घेतलेल्या खोटेपणाच्या भूमिकेची. आपण चालत असलेल्या मार्गाचा शेवट हा अनिश्चित आहे, वाटेत आणि अखेर जीवलगांची साथ सुटून जाण्याचा संभव आहे हे जाणूनही, केवळ अहंकाराच्या, सोयी-सवयीच्या आणि अज्ञानाच्या आधारे आपण मार्गक्रमण करीत राहिलो, तर आपलं स्वत्व आपण योग्य ढाच्यात बनवलं, बसवलं, बहरवलं असं म्हणू शकू का, याचं उत्तर शोधणं गरजेचं ठरतं. हा मार्ग त्यागून दुसरा निवडायचा ठरवणं, हीच मुळात आत्मज्ञान झाल्याची खूण आहे. सवय मोडणं, नवा सराव करणं, स्वत:ला याची सतत आठवण करून देणं आणि सत्याचा पुरस्कार करणं ही प्रक्रिया खडतर आहे, आव्हानात्मक आहे आणि स्वत्वाला पोषकही. कसा आखावा हा प्रवास?

प्रथम, ‘स्वीकार’- आपण खोटं बोलत असल्याचा, अयोग्य हेतू बाळगल्याचा. नंतर आपल्याला खोटं बोलण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी- स्थिती- व्यक्ती आणि आंतरिक मानसिक घडामोडीही. या व्यक्ती व प्रवृत्तींच्या सान्निध्यात असताना आपल्या विचार- भावना- कृती- दृष्टिकोनावर नेमका काय परिणाम होतो, दबाव पडतो, ज्या कारणाने आपण खोटं वागणं- बोलणं अवलंबतो. नेमक्या कोणत्या भावनेतून आपण ही भूमिका साकारतो- राग येतो म्हणून, वाईट वाटतं म्हणून, सूड घ्यायचा म्हणून, सवय-सोय म्हणून, आतापर्यंत फायदा झाला आहे म्हणून, लोकांना नियंत्रित ठेवता आलं आहे म्हणून, अपराधीपणाची भावना सतावते म्हणून की सत्य पुढे आणण्यासाठी- स्पष्टपणे, पारदर्शकपणे योग्य संवादशैली- शाब्दिक निवड- न जमल्याने, हे ओळखावं.

ही प्रवृत्ती योग्य वेळी न ओळखल्यास, अति प्रमाणात व नियमित वापरल्यास, खोटं बोलणं हे व्यसन बनू शकते. कारण अस्वस्थ करणाऱ्या भावना- घटना व परिस्थिती यांच्याशी नीतीपूर्वक लढा देण्यापेक्षा हा बऱ्याच जणांना सोपा व सोयीचा मार्ग ठरतो. आणि स्वास्थ्य खऱ्या अर्थाने व सर्वार्थाने अनुभवण्यासाठी, इतर व्यसनांप्रमाणे हे व्यसनही ताडणे उपयुक्तठरते. या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठीची काही मुख्य कारणं शोधली, तर हे सहज लक्षात येईल की, लोकांचा आपल्यावरील गमावलेला विश्वास परत मिळवणं, इतरांशी पारदर्शक नातं प्रस्थापित करणं, नात्यातील आनंद अनुभवणं, वस्तुस्थितीपासून दूर न जाता अधिक जवळ राहणं, स्वत्व सुयोग्य सिद्धांतांवर आधारणं- बांधणं- बहरवणं, ही आहेत. यासाठी विश्वसनीय व प्रगल्भ आप्तेष्टांची वा तज्ज्ञांची मदत जरूर घ्यावी. ही आव्हानात्मक प्रक्रिया आखताना, राबवताना गत परिस्थितीतील आपलं चुकीचं वर्तन- धोरण यांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. लोकांचा उपहास, विलक्षण प्रतिक्रिया आणि असहकार सहन करावा लागेल, परंतु परिवर्तनाची चिकाटी व आग्रह दर्शवल्यास त्यांचा स्वीकार व कौतुकही मिळेल.

त्यामुळे स्वत: हा मार्ग अवलंबावा हे सुनिश्चित आणि इतर लोकांकडून फसले न जाण्यासाठी ‘खोटे’ सिक्के त्याच्या  इतर वेळेपेक्षा बदलणाऱ्या शब्दनिवडीतून, संवादशैलीवरून, आवाजपट्टीवरून, देहबोलीतून, वाक्यरचनेवरून ओळखण्याचा प्रयत्न करावा. त्यांची सर्वसाधारण परिस्थितीतील वर्तणूक आणि त्यात खोटेपणाकडे वाटचाल करण्यास सुरुवात केल्यानंतर होणारे बदल, याकडे बारीक लक्ष ठेवावं, सावध व्हावं!

सत्याचा आग्रह धरल्याचं रूपांतर स्वातंत्र्यात झालेलं आपण भारतीयांनी अनुभवलेलं आहे. मग स्वत:च्या स्वत्वालाही या सिद्धांतावर उभारण्यास लाभ आहे, हे म्हणणं योग्य ठरेल!

डॉ. केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)