‘प्रपंच सुख देईल,’ या कल्पनेतून प्रपंचात आपण सतत सुखाचा शोध घेत राहिलो, पण बरेचदा खस्ता खाऊनही दु:खच वाटय़ाला आलं. आता ‘परमार्थ सुख देईल,’ ‘भगवंताच्या आधारे सुख लाभेल,’ या नव्या कल्पनेतून आपण अध्यात्माच्या मार्गाकडे वळलो. तरी सुख काही गवसलं नाही, ही भावना झाली, तर त्या भावनेनं साधक निराश होऊ  शकतो. याचं कारण सुखाची कल्पना माणूस करतो, पण खरं सुख म्हणजे काय, हेच त्याला नेमकेपणानं सांगता येत नाही.

दु:खाचा अभाव म्हणजे सुख, असं आपलं आकलन असतं. त्याच वेळी दु:ख म्हणजे तरी काय, हेसुद्धा स्पष्ट कळत नसतं! भगवंताच्या आधारेच सुख मिळेल, अशीही कल्पना माणूस करतो, पण जिथे भगवंत नेमका कसा आहे, तेच कळत नाही तिथे त्याचा आधार कसा घ्यावा आणि हा आधार म्हणजे तरी नेमका काय, हे तरी कुठं कळतं? पण जसं सुखाचं आकलन भ्रामक असतं तसंच दु:खाचंही आकलन भ्रामकच असतं. जे या घडीला दु:खाचं वाटतं तेच कालांतरानं योग्यच वाटू शकतं! तेव्हा समर्थ सांगतात, रामाचं चिंतन करताना मनात लेशमात्र कल्पना उरू देऊ  नका. कारण आपल्या सर्व कल्पनांची आजवरची घडण ही विषय वृत्तीचीच होती. या कल्पनेच्या आणि विषयाच्या बाधकतेचा ऊहापोह समर्थानी ‘मनोबोधा’च्या ६६व्या श्लोकापर्यंत केला आहे. या विषय कल्पनांमुळे साधक पथभ्रष्ट होतो आणि त्याच जिणं दैन्यवाणं होतं, असं समर्थ स्पष्ट बजावतात. तेव्हा परमार्थाच्या मार्गावर वळताना आपल्या अंतरंगातील कल्पनांची तपासणी केली पाहिजे. ‘जगावेगळं अध्यात्म’ (ढवळे प्रकाशन) या ग्रंथात पू. विमलाताई ठकार यांनी, आपल्याला अध्यात्माच्या माध्यमातून किंवा स्पष्ट सांगायचं तर अध्यात्माच्या नावावर नेमकं हवं तरी काय आहे, याची झाडाझडतीच घेतली आहे. त्यांनी काही थेट प्रश्नच उपस्थित केले आहेत. या मार्गावर आपण का आलो? मानसिक सुरक्षिततेसाठी आलो का? त्या सुरक्षिततेची हमी देणारा कुणीतरी सतत पाठीशी असावा, यासाठी आलो का? आपल्या इच्छा पूर्ण करण्याची ग्वाही देणारा कुणीतरी लाभावा, यासाठी आलो का? प्रापंचिक नात्यांच्या जागी आता काही नवी नाती हवी आहेत का? यासारखे अनेक प्रश्न त्या मांडतात. थोडक्यात ज्या मार्गावर कामनारहित होत जायचं आहे, तिथं नवनव्या कामनांच्या पूर्तीची आस निर्माण होत असेल तर निष्काम चिंतन कसं साधेल?

generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…

आता एक खरं की हे जे निष्काम चिंतन आहे, निष्काम भक्ती आहे ती निष्काम सद्गुरूंशिवाय साधणारही नाहीच. ‘दासबोधा’त समर्थ म्हणतात, ‘नि:काम बुद्धीचिया भजना। त्रेलोकीं नाहीं तुळणा। समर्थेविण घडेना। नि:काम भजन।।’ (दशक १०, समास ७, ओवी १९). जो खरा समर्थ आहे तोच निष्काम आहे. त्याच्या आधाराशिवाय निष्काम होता येणार नाही. जो भोंदू आहे तो स्वत:च कल्पनेच्या गाळात अडकला आहे. तो मला निष्काम कसं करू शकेल? भौतिकातच अखंड आणि खरं सुख मिळेल, या कल्पनेत जो स्वत: दंग आहे, तो मला भौतिकाबाबत उदासीन कसं करू शकेल? ज्याला स्वत:ला भगवंताची भेट म्हणजे काय, हे उमगलेलं नाही तो मला आत्मस्वरूपाची ओळख कशी करून देऊ  शकेल? मग तोही कल्पनांत दंग असेल आणि मीही कल्पनेतच साक्षात्कार शोधत राहीन. अशा अनंत कल्पनांच्या जोरावर त्या राघवाची खरी आत्मभेट होऊच शकत नाही! मनोबोधाच्या पुढच्या म्हणजे ५९व्या श्लोकाचा हाच भाव आहे. हा श्लोक असा आहे :

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी।

मनीं कामना राम नाहीं जयाला।

अती आदरें प्रीति नाहीं तयाला।। ५९।।

चैतन्य प्रेम