अनंत कल्पनांच्या जोरावर राघवाची आत्मभेट शक्य नाही, हे स्पष्टपणे मांडणाऱ्या, ‘मनोबोधा’च्या ५९व्या श्लोकाकडे आपण वळलो आहोत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू, मग मननार्थाकडे वळू. श्लोक असा आहे:

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी।

मनीं कामना राम नाहीं जयाला।

अती आदरें प्रीति नाहीं तयाला।। ५९।।

प्रचलित अर्थ : हे मना, कोटय़वधी कल्पना करीत राहिलास तरी रामाच्या भेटीचा योग त्यामुळे येणार नाही. ज्याच्या मनात कामना आहेत त्याला रामभेट तर नाहीच नाही, पण रामाविषयी त्याच्या अंत:करणात सादर भक्तीप्रेमही उत्पन्न होणार नाही.

आता मननार्थाकडे वळू. कल्पनेवर आणि कल्पनेच्या  शक्तीवर आपण या सदरात मागेही बराच ऊहापोह केला आहे. कल्पना ही माणसातली मोठी शक्ती आहे, यातही शंका नाही. याच कल्पनेच्या जोरावर माणसानं कला, साहित्य, विज्ञान आदी क्षेत्रांत मोठी झेपही घेतली आहे. पण त्याचबरोबर माणसाला भ्रमात, मोहात, अविचारात अडकवण्यातही कल्पनेचा प्रभावच अनेकदा कारणीभूत झाला आहे. समर्थानीही कल्पनेच्या या दुहेरी स्वरूपाचं वर्णन केलं आहेच. कल्पनेच्याच जोरावर मायेचं निवारण होतं, ब्रह्मभाव जाणता येतो.. कल्पनेच्याच जोरावर संशय उत्पन्न होतो आणि कल्पनेच्याच जोरावर तो निवारलाही जाऊ शकतो.. कल्पनाच बंधक असते आणि कल्पनाच समाधान देते.. भगवंताचं अनुसंधान हेदेखील पहिल्या पातळीवर कल्पनेनंच साधतं, हे समर्थाचं म्हणणंही आपण मागे पाहिलं होतं. समर्थाच्या त्या मूळ ओव्या अशा आहेत- ‘‘कल्पना माया निवारी। कल्पना ब्रह्म थावरी। संशय धरी आणी वारी। तेहि कल्पना।। कल्पना करी बंधन। कल्पना दे समाधान। ब्रह्मीं लावी अनुसंधान। तेहि कल्पना।।’’ (दासबोध दशक ७, समास ५, ओव्या १८, १९ ). मग ‘‘प्रपंच सुख देईल,’’ ही कल्पनाच आणि ‘‘भगवंताच्या आधारे सुख लाभेल,’’ हीदेखील कल्पनाच खरी, पण तरी सुरुवातीला प्रपंचासक्ती काढण्यासाठी ही दुसरी कल्पनाच ग्राह्य़ आहे! कारण समर्थही सांगतात, ‘‘कल्पनेनें कल्पना सरे।’’ पण एकदा, ‘प्रपंच सुख देईल,’ या कल्पनेतला फोलपणा जाणवू लागला की मग ‘भगवंताच्या आधारे सुख लाभेल,’ या कल्पनेचीही खोलवर तपासणी सुरू झाली पाहिजे. कारण भगवंत म्हणजे काय, हे कल्पनेनं कळणार नाही! समर्थही या ५९व्या श्लोकात स्पष्टपणे सांगतात, ‘‘मना कल्पना कल्पितां कल्पकोटी। नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी।।’’ कल्पांतापर्यंत जरी कोटय़वधी कल्पना करीत बसलात तरी रामाची भेट होणार नाही! पुढे समर्थ हेही बजावतात की, ‘‘मनीं कामना राम नाहीं जयाला। अती आदरें प्रीति नाहीं तयाला।।’’ जर केवळ भगवंतच हवा, ही कामना उरली नसेल तर त्याच्या प्राप्तीसाठी अत्यादरपूर्वक, प्रीतीपूर्वक प्रयत्नही होणार नाहीत. आता हा भगवंत जाणण्याचा उपाय काय? तर कल्पनेची नव्हे, तर सत्याची संगति! जो सत्याशी अखंड जोडला आहे, सत्य, शाश्वत तत्त्वाशिवाय अन्य कशांतही ज्याला रस नाही त्याची संगती हीच सत्संगति आहे. सद्गुरूंचा, त्यांच्या बोधाचा, त्यांच्या ग्रंथाचा असा संग लाभू शकतो, पण या संगाचा परिणाम अंतरंगात जितका खोलवर होईल तितका आध्यात्मिक प्रवास वेगानं होईल. सदोदित परमात्मचिंतनात निमग्न अशा सद्गुरूंच्या संगातून आपलं मनही हळूहळू व्यापक होऊ शकतं आणि परम तत्त्वाशी हळूहळू जोडलं जाऊ शकतं. पण त्याचवेळी आंतरिक बैठकही स्थिर होत गेली पाहिजे! नाहीतर काय होतं, ते पुढील सात श्लोकांत समर्थानी स्पष्टपणे सांगितलं आहे.

-चैतन्य प्रेम