सद्गुरूंचं प्रथम दर्शन झालं तेव्हाचा प्रसंग मनावर अगदी कोरला गेला आहे. साधनेची सुरुवात गोंदवल्यापासून झाली होती आणि त्यानंतर सद्गुरूंची भेट झाली. ते अगदी गंभीर मुद्रेनं शांतपणे बसून होते आणि त्यांच्यासमोर बसल्यावर काही क्षण गेले तरी अगदी मौनात होते. ती शांतता मनात फार कल्लोळ निर्माण करीत होती. त्यांच्याशी काय बोलावं, हेच समजत नव्हतं. काहीतरी बोलायचं म्हणून, बोलणं सुरू व्हावं म्हणून म्हणालो की, ‘‘मी रामनाम घेतो.’’   त्यावर त्यांनी ताडकन विचारलं, ‘‘रामनामही क्यों? और कोई मंत्र नहीं मिला ?’’ रामनामच का? दुसरा काही मंत्र मिळाला नाही? हा प्रश्न अगदी धारदार होता आणि मनात अधिकच कल्लोळ निर्माण करणारा होता. खरंच आपण स्वत:ला धार्मिक म्हणवतो, पण त्या धर्माचं खरं स्वरूप जगण्यात जाणवतं? स्वामी विवेकानंद यांची अमेरिकेत ठिकठिकाणी प्रवचनं होऊ लागली तेव्हा, हे आपला धर्म बुडवायला आले का, या भीतीनं काही ख्रिस्ती धर्मप्रचारक त्यांच्या भाषणाला आले होते. स्वामीजी त्या दिवशीच्या व्याख्यानाची सुरुवात हसून करीत म्हणाले की, ‘‘मी कुणालाही हिंदूू करायला आलेलो नाही. मी हिंदूला अधिक चांगला हिंदू आणि ख्रिस्ती माणसाला अधिक चांगला ख्रिस्ती करायला आलो आहे!’’ आणि खरंच आपण धार्मिक, धर्मप्रेमी, धर्मनिष्ठ असतो पण खऱ्या धर्मतत्त्वांना जगण्यात उतरवणारे नसतो. अगदी त्याचप्रमाणे नाम तर सतत घेत होतो, पण त्या नामाचं खरं स्वरूपच जाणत नसल्यानं हेच नाम का, हाच इष्टदेव का, असे विचार कधी मनात आलेच नव्हते. मी म्हणालो, ‘‘मी अज्ञानी आहे. जे सांगितलं गेलं ते करतोय.’’ सद्गुरू प्रसन्नतेनं हसले आणि म्हणाले, ‘‘जग्गजेत्रकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्। य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय:।।’’ पुन्हा तेच! रामरक्षा कितीदा तोंडपाठ म्हटली होती, पण रामनामाचं हे त्यातलं माहात्म्य कधी भिडलं नव्हतं! गुरूजी म्हणाले, ‘‘ जेवढे म्हणून मंत्र आहेत त्यांना रामनामाचं कवच आहे! हा मंत्र धारण केला की सर्व सिद्धी हाती येतात!’’ तर ज्याचं नामदेखील सर्वसिद्धीदायक आहे, असं संत सांगतात तो कल्पवृक्षाहून अधिक नसेल का? आणि इथंच खरी मेख आहे! आपल्याला रामाच्या प्राप्तीपेक्षा सिद्धीच्या प्राप्तींचीच आस असते! सिद्धी खऱ्या की खोटय़ा हे माहीत नसलं तरी आस असते आणि त्या सिद्धीसुद्धा कशासाठी हव्या असतात? तर भौतिक जगणं सुखाचं करण्यासाठी! पण नुसतं नाम घेत गेल्यानं सिद्धी हाती येत नाहीत. ते नाम धारण करावं लागतं! नुसता राम कल्पतरू नाही.. त्याच्या कृपाछायेत जावं लागतं! आणि हे नाम धारण करणं म्हणजे काय? त्याच्या कृपाछायेत जाणं साधणं म्हणजे काय? हे जोवर उकलत नाही तोवर नुसतं नाम घ्या आणि रामाच्या मंदिरात कितीही खेपा घाला त्याचा काय उपयोग? तेव्हा आज आपण रामांच्या कृपाछायेत नसू, नाम खऱ्या अर्थानं धारण केलेलं जीवन जगत नसू तरीही तोच राम तोच परमात्मा हा आपल्या जगण्याचा एकमात्र आधार आहे. त्या शाश्वत तत्त्वाकडून आपल्यातही एक शाश्वत दुवा सक्रीयपणे टिकून आहे. हा ‘दुवा’च आपल्याला त्या कृपाछायेत नेण्यास, ते नाम धारण करण्याची क्षमता पुरविण्यास समर्थ आहे. काय आहे हा दुवा? हा दुवा म्हणजेच जीवनशक्ती! जी प्राणरूपानं आपल्या प्रत्येकात आहे. ही प्राणशक्ती देहात आहे तोवरच जीवन आहे आणि ती जेव्हा या देहातून जाते तेव्हा त्यात आता ‘राम’ राहिला नाही, असंच आपण म्हणतो! याच जीवनशक्तीच्या, प्राणशक्तीच्यायोगे आपण बद्धही आहोत आणि मुक्तही होऊ शकतो! कारण ही प्राणशक्ती संकल्पशक्तीच्याच रूपानं जीवनाला प्रवाहित करीत आहे. या संकल्पवृक्षाच्याच छायेत आपण खरं तर अनंत जन्मं उभे आहोत!

चैतन्य प्रेम