मुक्ता… शाळेपासूनच बडबडी… उत्साही… इतर मुलींपेक्षा थोडी वेगळीच… जे सर्वसामान्य मुलींना आवडायचं ते ती कधीच करायची नाही… तिने स्वतःतलं वेगळेपण आधीच ओळखलं होतं. करिअरच्याबाबतीतही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरींग असे सरळ मार्ग न निवडता ज्या फिल्डमध्ये मुलींना सहसा पाठवत नाहीत अशा मीडिया फिल्डमध्ये ती गेली. सतत माणसांमध्ये राहायला तिला आवडायचं. माणसांशी बोलणं, त्यांचा स्वभाव समजून घेणं, त्यांच्या मदतीला येणं यातच तिचे दिवस, महिने आणि वर्षे जायची.

दिसण्यात मुक्ता तशी फार सुंदर नव्हती. गर्दीत चालताना तिच्याकडे दोन कारणांमुळे लोकांच्या नजरा जायच्या. एकतर ‘ऐ ती मुलगी बघ किती बारीक आहे…’ म्हणून आणि दुसरी म्हणजे तिचे कुरळे केस. अशी ही हडकुळी, त्यात चष्मा लावणारी मुक्ता दिसण्याच्या बाबतीत स्वतःला नेहमीच दुय्यम मानायची. पण आपल्याकडे असणारा आत्मविश्वास इतर कोणत्याही मुलीमध्ये नाही याचा तिला नेहमीच अभिमान वाटायचा.
कुटुंबातील एखादं कार्य असो, मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाणं असो किंवा ऑफिसमधले सहकारी असो ती गेल्यावर हसणं सुरू झालं नाही असं व्हायचंच नाही. अशा या सर्वांना आपलंस करणाऱ्या मुक्ताकडे प्रत्येकजण आपली गुपितं घेऊन यायचा. अगदी घरातल्या भांडणांपासून ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सपर्यंत सगळं काही मुक्ताला माहिती होतं. तिला तिच्या या यूएसपीबद्दल चांगलीच कल्पना होती. तिच्या आजूबाजूला अशी एकही व्यक्ती नव्हती ज्याचं गुपित तिला माहिती नसेल. बुद्धीला पटलं आणि जमत असेल त्या पद्धतीने ती त्यांना मदतदेखील करायची.

एखाद्यासाठी नोकरी शोधणं असो किंवा मित्राला कोर्ट मॅरेजसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी मुक्ता अगदी हसत हसत मदत करायची. तिचं असं उत्साही, आनंदी असण्याचा सर्वांना हेवा वाटायचा. तिच्यातली अजून एक गोष्ट होती जी तिला इतरांपासून वेगळं करायची ती म्हणजे तिचं हसू. तिच्यासारखं अनोखं हसू कोणाचंच नसेल. तिचं खळखळून हसणं पाहणं हा दुसऱ्यांसाठी एक विरंगुळा असायचा. ती मनमुराद हसायला लागली आणि आजूबाजूच्या १५-२० जणांनी तिच्याकडे पाहिलं नाही असं होणंच अशक्य. आकाशालाही ऐकू जाईल इतक्या अनोख्या पद्धतीने ती हसायची. ‘देवाने मला दोन देणग्या दिल्या त्यातली एक म्हणजे माणसं जोडून ठेवणं आणि दुसरी म्हणजे हासू,’ असं मुक्ता नेहमीच म्हणायची… तू नेहमीच हसरी कशी राहू शकतेस.. तुला काही प्रॉब्लेम नाही का असे एक ना अनेक प्रश्न तिला विचारले जायचे. पण या सर्वांकडेही ती हसूनच उत्तर द्यायची.

अशा या मुक्ताचं कुटुंबही अतरंगी होतं. सर्वसामान्य मराठी कुटुंबांमध्ये असं कुटुंब सापडणं तसं दुर्मिळच. मुलगी आहे म्हणून कधीही कोणत्याही प्रकारची बंधंनं तिच्यावर लादण्यात आली नाहीत. रात्री-अपरात्री ऑफिसवरुन आल्यावरही तिला तुला एवढा वेळ का झाला असा प्रश्न कधी विचारण्यात आला नाही. फिरायला जाताना किती मुलं आहेत किती मुली आहेत हे प्रश्न तर तिला विचारण्यात आले नाहीत. कुटुंबात सर्वात लहान असल्यामुळे अर्थात सर्वांची ती लाडकी होती. मुक्तानेही कधी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. स्वच्छंदी, धाडसी असली तरी मर्यादा पाळून होती.

तिचा मित्र-परिवार मोठा होता पण त्यातही ती तिच्या शाळेतल्या ग्रुपसोबत अधिक रमायची. तिच्या त्याच ग्रुपमधल्या एका मुलाच्या ती नकळत प्रेमात पडली. अजय त्याचं नाव. हे कधी झालं, केव्हा झालं याचं उत्तर आजही तिच्याकडे नाही. पण ती प्रेमात पडली होती. तोही दिसायला फार चांगला होता अशातला भाग नव्हता. तिच्या ग्रुपमध्ये त्याच्याहून चांगले दिसणारे एक- दोनजण होते. हॅण्डसम बॉयफ्रेण्ड हवा किंवा नवरा हवा ही व्याख्याच तिला मान्य नव्हती. तिची आई देवभक्त तर बाबा कर्मावर विश्वास ठेवणारे. कर्म चांगली असतील तर देवही काही वाईट करु शकत नाहीत, असा तिच्या बाबांचा ठाम विश्वास. तर चांगल्या कर्माला योग्य दिशा प्रार्थनेमधून मिळते असा आईचा विश्वास या दोघांच्या विश्वासाची सरमिसळ म्हणजे मुक्ता होती. मुक्ताची पांडुरंगावर श्रद्धा होती. काहीही झालं तरी तिच्या तोंडी पांडुरंग, विठ्ठल, श्री हरी, माऊली अशीच नावं यायची. देवावर श्रद्धा असूनही ती कधी पंढरपूरला मुद्दाम देवदर्शन करायला जावं म्हणून गेली नाही. वारी करत पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं ही तिच्या अनेक इच्छांपैकी एक इच्छा. पण कामाच्या निमित्ताने वारीला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याची तिची इच्छा आजही आहे.
पांडुरंगावर श्रद्धा असणाऱ्या मुक्ताने अजयचं टोपण नावही माऊलीचं ठेवलं होतं. फोनमध्ये त्याचं नाव तिने माऊली असंच सेव्ह केलं होतं.

प्रेमात पडणं काय असतं याचा नवीन अनुभव ती घेत होती. तिचं तिलाही माहिती नव्हतं की याला नेमकं काय म्हणतात. कामात असतानाही तिच्या डोक्यात त्याचेच विचार असायचे. सतत त्याच्याशी बोलत राहावं असंच तिला वाटायचं. दोघंही एकमेकांशी खूप बोलायचे. अर्थात त्याच्या मनात मुक्ताबद्दल तसे काही विचार नसल्यामुळे तो फक्त एक मैत्रिण म्हणून तिच्याशी बोलायचा. मुक्ताला तो आवडू लागलाय ही चुणूक हळहळू त्यांच्या ग्रुपमध्ये सर्वांना कळू लागली होती. त्यानंतर जे सर्व ग्रुपमध्ये होतं तेच एकमेकांना नावाने चिडवणं, मस्करी उडवणं सुरू झालं होतं. माऊलीला हे हळूहळू कळायला लागलं आणि तो मुक्ताशी अंतर ठेवून राहायला लागला. शक्य तितक्या पद्धतीने तो तिच्या दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नांमध्ये त्याने कळत-नकळत अनेकदा तिचा अपमान केला. हा अपमान तिच्या जिव्हारी लागायचा. पण तरीही आपण काही बोललो तर इतर मित्र-मैत्रिणी त्याच्याशी बोलणं टाकतील याची तिला खात्री होती. तो कधीही एकटा पडू नये यासाठी ती नेहमीच प्रयत्न करायची. पण एक दिवस त्याने व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्याची एमबीए कॉलेजची मैत्रिण गर्लफ्रेण्ड असल्याचं सांगून सर्वांनाच धक्का दिला होता… तिच्यासोबतचा फोटो त्याने ग्रुपवर टाकला होता. त्याच्या त्या गोष्टीला मुक्ता कशी स्वीकारेल, असाच प्रश्न अनेकांना होता. त्यामुळे थोडावेळ कोणंच काही बोललं नाही. मुक्ताच्या ते लक्षात आलं, म्हणूनच त्याचं अभिनंदन करणारा पहिला मेसेज मुक्ताचा होता.

(क्रमशः)
– तीन फुल्या, तीन बदाम