”कॉफी घेणार का?” डोक्यावर हात ठेवून बसलेल्या परागनं मागं वळून पाहिलं. मागं वर्धा हातात कप घेऊन उभी होती.

”ही बाई का सारखी माझी आई असल्यासारखी वागते. मला अजिबात एकटं सोडत नाही. सारखं जेवलास का? खाल्लंस का? बरं वाटतंय का? शंभर प्रश्न विचारत असते” परागनं त्रासिक चेहऱ्यानं तिच्याकडं पाहिलं.

“अरे डोकं दुखतंय ना तुझं? कॉफी घे. जरा फ्रेश वाटेल.”, वर्धानं कॉफीचा कप त्याच्या पुढ्यात ठेवला आणि ती निघून गेली.

परागनं इरिटेटेड होऊन त्या कपकडं पाहिलं. “किती वेडी आहे ही बाई. हा काय कप आहे का? सगळीकडे कार्टूनच्या प्रिंट आहेत यावर. एवढी मोठी झाली तरी किती बालीश आहे लहानमुलांसारखी कार्टूनच्या कपमधून कॉफी पिते आणि त्यातून माझ्यापुढं हा कप आणून ठेवलाय. फोडून टाकू का तो?” मनात एक विचार आला, पण जाऊ दे म्हणत त्यानं कॉफीचा घोट घेतला आणि कामाला लागला.

वर्धा आणि पराग एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. वर्धा परागपेक्षा लहान असली तरी ती सिनिअर होती आणि परागची चांगली मैत्रिणही होती. पण कधी कधी तिची मैत्री परागला असह्य व्हायची. परागच्या प्रत्येक छोट्या मोठ्या सवयी, आवडी निवडी वर्धाला चांगल्या माहिती होत्या. त्यामुळं त्या जपण्यासाठी तिची सारखी धडपड असायची. ऑफिसमध्ये तर त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसे. पण कधी कधी तिच्या काळजीचा इतका अतिरेक व्हायचा की पराग इरिटेट व्हायचा. कितीही झालं तरी तिच्याशिवाय आपलं पानही हलत नाही, हेही त्याला चांगलं माहिती होतं. ऋतुजा सोडून गेल्यावर एक तीच तर होती.

त्याची सारखी चिडचिड व्हायची, इतरांवर त्याचा राग निघायचा. सहकाऱ्यांसोबत अनेकदा विनाकारण खटके उडायचे. तेव्हा वर्धाच सांभाळून घ्यायची. आज परागला पुन्हा ऋतुजाची आठवण छळत होती. ऋतुजानं फेसबुकवर नुकताच एका मुलासोबत फोटो अपलोड केला होता. ते पाहून परागला जास्तच त्रास होत होता.

आता मात्र काम करणं त्याला कठीण होऊ लागलं. काही मिनिटांपूर्वी नको असलेली वर्धा त्याला हवी होती, त्यानं इथून वर्धाचा फोन डाएल केला.

”हॅलो कँटिनमध्ये ये लवकर”

“हो आले” वर्धानं फोन ठेवला आणि कँटिनमध्ये गेली.

परागचं काहीतरी बिनसलं आहे तिला कळत होतं.

“काय रे आता काय झालं? पुन्हा ऋतुजाची आठवण आली का?”

“हो, मला नाही सहन होतं आता. सारखी तिची आठवण येतेय, आज तिनं तिच्या एका नव्या बॉयफ्रेंडसोबत फोटो अपलोड केलाय फेसबुकवर. ती असं कसं करु शकते. नऊ वर्षे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो वर्धा. आणि आता दुसऱ्यासोबत?” परागच्या पापण्या ओलावल्या.

“कामामुळं मी तिला वेळ द्यायचो नाही अशी तक्रार ती सतत करायची. मान्य आहे की मी तिला वेळ द्यायचो नाही, पण मल्टिनॅशनल कंपनीत काम काय वेळेप्रमाणं होतात का? कधी मीटिंग तर कधी बाहेरगावी जाणं तर कधी रात्रभर थांबावं लागतं. तिला माहिती नव्हतं का? सगळं तिच्यासाठीच तर करत होतो मी. तिलाच लग्नानंतर स्वत:च घर हवं होतं ना? तिच्या सुखासाठीच तर मी राबत होतो ना? पण माझी बाजू तिनं कधीच समजून घेतली नाही आणि हे बघ आता दुसऱ्यासोबत फोटो टाकलाय. ”
त्यानं वर्धाला फोटो दाखवला.

”हो पराग पण आता किती वेळा त्याच आठवणी घेऊन तू रडणार आहेस? तिला मिळालं दुसरं कोणीतरी ती गेली. बघ ऋतुजा खूश रहावी, असं वाटतंय ना तुला? ती कोणासोबतही का असेना. खूश आहे ना! झालं तर.. आणि तूही यातून जितक्या लवकर बाहेर पडशील तेवढं तुझ्यासाठी चांगलंय. माझ्याकडेच बघ ना प्रेमाबिमाच्या भानगडीत पडायचंच नाही मी तर ठरवलंय. आणि तू किती चांगला आहे. हँडसम आहेस. चांगल्या कंपनीत कामाला आहेस कोणतीही मुलगी तुला सहज हो म्हणेल. कशाला टेन्शन घ्यायचं.”
वर्धाच्या शेवटच्या वाक्यावर परागची कळी खुलली.

” तू बघच तुला नक्कीच चांगली मुलगी मिळेल, समजून घेणारी आणि आयुष्यभर साथ देणारी. आपल्यासाठी जे योग्य असतं तेच देव आपल्याला देतो, त्यामुळे तुला पण नक्कीच चांगली मुलगी मिळेल.” मगापासून शांत असलेला पराग हसला.

”वर्धा ना कोणाचाही मूड फटक्यात चांगला करु शकते.” ऋतुजाची आठवण आली की पराग वर्धाला फोन किंवा मेसेज करायचा. वर्धाशी बोललं की छान वाटायचं. काही काळासाठी का होईना पराग वर्धाच्या कंपनीत ऋतुजाला विसरून जायचा. वर्धा नेहमीच परागचं ऐकून घ्यायची, कधी समजूत काढायची तर कधी रागवायची. जीवाला जीव देणारी होती. वर्धाशी हळूहळू तो इमोशनली कनेक्ट होत होता. आपण वर्धाच्या कंपनीत ऋतुजाला विसरतोय याचीही जाणीव त्याला होत होती. पण शेवटी वर्धा ती वर्धा. ती ऋतुजाची जागा कधीच घेऊ शकत नाही, हाही विचार त्याला कुठेतरी अडवायचा.

दुसऱ्या दिवशी पराग ऑफिसला आला, वर्धा मात्र कुठं दिसत नव्हती. ऑफिसमध्ये आल्या आल्या तिला पाहायची सवय होती. तिच्या तोंडून ‘गुड मॉर्निंग’ ऐकल्याशिवाय त्याच्या कामाला सुरूवातच होत नसे. त्यानं तिला फोन लावला तिनं काही उचलला नाही. परागनं तिची चौकशी करण्यासाठी रिसेप्शनवर फोन डाएल केला, तेव्हा मॅडम उशीरा येणार असल्याचं त्याला कळलं. पराग आपल्या कामात बिझी झाला. थोड्यावेळात मागून आवाज आला

”गुड आफ्टरनून”

त्यानं मागं वळून तिच्याकडं पाहिलं. तिला पाहून परागला धक्काच बसला. ही नेहमीची वर्धा नव्हती. नेहमी ट्राऊजर, ब्लेझर किंवा स्कर्टमध्ये ऑफिसला येणाऱ्या वर्धाला अचानक काय झालं होतं तो बघतच बसला. आपले लांब केस पहिल्यांदाच तिने सोडले होते. त्यातून काळ्या रंगाचा कुडता आणि त्यावर केशरी रंगाचा प्लाझो तिनं घातला होता. गळ्यात ऑक्साईडच्या ज्वेलरीमुळं ती आणखीन खुलून दिसत होती. आज तिनं चक्क हातात ऑक्साइडच्या का होईना पण बांगड्याही घातल्या होत्या. डोळ्यात काजळाची रेघ ओढली होती. कोणालाही तिनं नजरेनं घायाळ केलं असतं इतकी ती छान दिसत होती. ओठांवर नेहमीची मॅट लिपस्टिक होती. सारं काही एकदम परफेक्ट!

”काय मॅडम आज वेस्टर्नवरून एकदम ट्रेडिशनल आउटफिटमध्ये? अचानक कसा काय बदल घडला?” परागच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य अजूनही लपत नव्हतं.

”अरे काही नाही जस्ट फार अ चेंज म्हणून घातलंय” वर्धा स्माईल करत निघून गेली. ठरल्याप्रमाणे दोघेही कँटिनमध्ये जेवायला गेले. कँटिनमध्येही अनेक जण वर्धाकडे पाहत असल्याचे परागच्या अधून मधून लक्षात येत होतं. एकतर आज वर्धा खूपच सुंदर दिसत होती आणि नेहमी वेस्टर्नमध्ये असलेल्या तिला चक्क पारंपरिक कपड्यात पाहून सगळ्यांना धक्का बसला होता. वर्धाकडं ऑफिसमधले इतर मुलंही चोरुन पाहत असल्यानं परागचाही थोडा जळफळाट झाला.

”चल आपण निघूया इथून. इथे सगळे तुलाच बघतायत” तो रागत म्हणाला आणि चालू लागला.

दोघेही आपापल्या कामात बिझी झाले. परागच्या डेस्कसमोरच वर्धाची केबिन होती. काचेच्या केबिनमधून कामात गुंग असलेली वर्धा त्याला दिसत होती. याआधी कधीच परागनं वर्धाला असं पाहिलं नव्हतं. आज कितीतरी वेळा चोरून चोरून त्यानं तिला पाहिलं. ”खरंच आज खूपच सुंदर दिसतेय ती. कोणीही तिच्या प्रेमात सहज पडले. पण ही अजूनही सिंगलच आहे. सगळं तर आहे. करिअर सेट आहे, दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, कोणीही एका पायावर तिला हो म्हणेल.” परागचं लक्ष तिच्याकडं जास्त आणि कामात कमी होतं.
इतर कोणी आपल्याकडं पाहत नाही ना, हे बघून परागनं पुन्हा एक चोरटी नजर तिच्यावर फिरवली.

”ही एवढी सुंदर दिसते. आपण तिला कधीच नीट पाहिलं नाही. तिच्यात काय कमी आहे? माझी काळजी करते, मला समजून घेते, माझ्या सगळ्या आवडी निवडी तर तिला माहिती आहेत. मग मीच का नाही तिचा मैत्रिणीपलिकडे विचार केला? ऋतुजाच्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी नेहमीच तिची मदत घेतली. रात्री अपरात्री तिला फोन केले. ती नेहमीच माझी बडबड ऐकून घ्यायची. एकदाही तिने तक्रार केली नाही. ती ऋतुजाची जागा कधीच घेऊ शकत नाही, असं मला वाटयचं. पण का घेऊ शकत नाही? नक्कीच ती ऋतुजाची जागा घेऊ शकते.” इतक्या महिन्यात पहिल्यांदाच परागच्या डोक्यात हा विचार चमकून गेला.

त्या दिवसापासून वर्धा त्याला आवडू लागली होती. मैत्रिणी पलीकडे जाऊन तो तिच्याकडं पाहत होता. ऑफिसमध्ये तिच्याकडं चोरून बघणं, गालातल्या गालात लाजणं सुरू होतं. वर्धात तो इतका गुंतत चालला होता की आता तर वर्धाचा कार्टूनचा कपही त्याला आवडू लागला होता. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचे बहाणे तो शोधत होता. घरी गेल्यानंतरही वर्धाला फोन करायचा, पण आता नेहमीसारखं ऋतुजा पुराण त्यात नव्हतं. गेल्या महिन्याभरापासून ऋतुजाचं नाव एकदाही वर्धानं त्याच्या तोंडून ऐकलं नव्हतं. वर्धाला परागच्या बदललेल्या वागण्याचं आश्चर्यही वाटत होतं आणि समाधानही.

दुसऱ्या दिवशी महत्त्वाची मीटिंग होती. वर्धाला प्रेझेंटेशन द्यायचं होतं. पराग आणि वर्धा उशीरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून काम करत होते.

”पराग उद्याची मीटिंग खूप महत्त्वाची आहे. कसंही करून डिल क्रॅक करायचं आहे आपल्याला.” वर्धानं फारच टेन्शन घेतलं होतं.

”हो मॅडम, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. सगळी तयारी मी पूर्ण केलीये. तू फक्त एकदा पीपीटीवर नजर टाक मग झालं काम. पण त्याआधी कॉफी घे आणि छान फ्रेश हो’

दोघंही कँटिनमध्ये गेले.

”पराग उद्याची मीटिंग झाल्यानंतर मला आठवडाभरासाठी चेन्नईला जावं लागेल.”

परागचा चेहरा पडला. दोघंही कॉफी घेऊन डेस्कवर आले. पराग पुरता अस्वस्थ झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता ओळखायला तिला अजिबात वेळ लागला नाही.

”काय रे सगळं ठिक आहे ना? अचानक गप्प झालास. ऋतुजाची आठवण येतेय का?”

”नाही”

”मग”

”तू मला सोडून का जातेय चेन्नईला?”

“ अरे सोडून कुठे चाललीये एक आठवड्याचा तर प्रश्न आहे. आणि यापूर्वीही अनेकदा मी गेलीय बाहेर. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तूला कामात काही अडचण आली तर मला फोन कर मी तिथून मॅनेज करेल सगळं”

”मला ते काही माहित नाही. तू मला सोडून जाऊ नकोस”

”पराग वेड लागलंय का तुला, असं का बोलतोस”

पराग डेस्कवरून उठला. वर्धाला त्यानं जवळ ओढलं, ”वर्धा, I love you मला तू आवडतेस.”

”पराग” त्याची खांद्यावरची पकड सोडवत वर्धा बाजूला झाली.

”वर्धा प्लीज, खरंच मी तुझ्यासाठी वेडा झालोय, मला तू आवडतेस. फक्त एकदा हो म्हण. आयुष्यात तुला कसलीच कमी पडू देणार नाही.”

”पराग, पण तुझं ऋतुजावर प्रेम आहे ना?”

”तूच म्हणालीस विसर तिला. ती तिच्या आयुष्यात खूश आहे आणि आता मलाही नवं आयुष्य सुरू करायचं आहे फक्त तुझी साथ हवीये”

”बघ पराग तू चांगला आहे, माझा चांगला मित्रही आहे. पण तुला माहितीये ना मला प्रेम, लग्न यात पडायचं नाही. मला या सगळ्याची भीती वाटते. तू ऋतुजावर जीवापाड प्रेम करतोस मला माहितीये. तुझ्या आयुष्यात तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मी जर यात अपयशी झाले आणि तू मला सोडून गेलास तर मी सहन नाही करु शकत ”

”वर्धा गेल्या महिन्याभरात एकदाही तू ऋतुजाचं नाव माझ्या तोंडून ऐकलंस का ग? मी खरंच तिच्यातून बाहेर पडलोय. मी तुला शपथ देतो, की तुला मी कधीच सोडून जाणार नाही. ऋतुजामुळं तुझ्यावर कोणताही अन्याय होणार नाही. ती कधीच आपल्यात येणार नाही. ना मी येऊ देणार.”

परागनं वर्धाचा हात हातात घेतला. ”तू विचार कर आणि उत्तर दे.”

काही मिनिटांपूर्वी जे काही घडलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हतं. केबिनमध्ये बसून ती स्वत:ला सावरायचा प्रयत्न करत होता. पराग पलिकडून अजूनही आपल्याकडं बघतोय हे तिला जाणवत होतं. गेल्या २६ वर्षांत तिनं कधीच कोणालाही आपल्याजवळ येऊ दिलं नव्हतं. प्रेमात पडलं की माणसाचा नाश अटळ. अशा विचाराची ती होती. ती सुंदर होती, हुशार होती तिच्या जवळ प्रेमाची कबुली देणारा पराग काही पहिलाच नव्हता. यापूर्वीही अनेकांनी तिला प्रपोज केले होते. पण तिने नेहमीच सगळ्यांना नकार दिला होता. करिअर घडवायचं आणि स्वत:चं स्थान बळकट करायचं असा तिचा विचार होता. पण परागची गोष्ट वेगळी होती. पराग जवळचा मित्र होता. शिवाय तिचं त्याच्याशी चांगलं पटायचं. पराग आपल्या करिअरच्या आड कधीच येणार नाही, ना आपल्याला फसवणार हे तिला माहिती होतं, पण आयुष्यातला मोठा निर्णय घेताना तिला चुकायचं नव्हतं. एवढ्यात केबिनमध्ये फोन वाजला.

”मॅडम तुमचा ड्रायव्हर आलाय.”

वर्धानं लॅपटॉप बंद केला आणि निघाली.

”पराग पीपीटी ओके आहे. तू निघालास तरी चालेल. सकाळी लवकर मीटिंग आहे. ती आवरली की मी तिथूनच चेन्नईला जाईन”
ती नेहमीसारखी बोलली नाही हे परागला कळलं होत, पण याक्षणी काही न बोलण्याचं त्यानं ठरवलं. आपणच चूक केली की काय त्याला वाटू लागलं, पण तिच्यावरच प्रेम त्याला लपवताही येत नव्हतं.

मीटिंगमध्ये डिल क्रॅक करण्यात तिला यश आलं. तिने परागला मेसेज केला, पण पराग ज्याची वाट पाहत होता ते मात्र तिने मेसेजमध्ये लिहिलं नव्हतं. वर्धा तिथूनच चेन्नईला गेली.

पराग ऑफिसमध्ये पोहोचला. वर्धाशिवाय एक आठवडा त्याला काढायचा होता. तिच्या केबिनमधल्या रिकाम्या खूर्चीकडे तो बघत होता. त्यानं कसंबसं स्वत:ला कामात गुंतवून घेतलं. पण सारखं लक्ष मोबाईलकडं लागलं होतं. वर्धाचा मेसेज येईल असं त्याला वाटलं होतं पण तिने पूर्ण दिवसात एकदाही मेसेज केला नाही. परागनंही तिला स्वत:हून मेसेज न करण्याचं ठरवलं.

तीन दिवस तसेच गेले. वर्धा आपल्याला कधीच होकार देणार नाही असं त्याला वाटलं, फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावरून लपत नव्हतं. एवढ्यात फोन व्हायब्रेट झाला. तो वर्धाचा फोन होता तिने व्हिडिओ कॉल केला होता. परागनं लगेच फोन उचलला.

”हॅलो”

”हॅलो, माझ्याच फोनची वाट बघत होतास ना”

”हो. तुला माहिती होतं ना? मग का नाही केलास तीन दिवस फोन? किती छळलंस तू मला ”

”पण यापुढे नाही छळणार”

”म्हणजे?”

” म्हणजे माझा तूला होकार आहे”

”काय?” पराग जोरात ओरडला.

”तू खरंच मला होकार दिलाय वर्धा” परागाचा आनंद गगनात मावत नव्हता. एव्हाना आजूबाजूचे लोकही परागकडं पाहू लागले.

” yes पराग, I love you too”

”तीन दिवस विचार केला आणि शेवटी तुला होकार दिलाय. म्हटलं मुंबईत येऊनच तुला बोलेल. पण मला राहवत नव्हतं, म्हणून व्हिडिओ कॉल केला.”

इतक्या महिन्यानंतर पराग पहिल्यांदाच खूश होता. त्याची सगळ्यात जवळची मैत्रिणी आत त्याची आयुष्यभरासाठी सोबतीण होणार होती. दोन दिवसांनी वर्धाही चेन्नईतून परतली.

एव्हाना ऑफिसमध्ये सगळ्यांना वर्धा परागची लव्हस्टोरी माहिती झाली होती. डायरेक्ट सिनिअरशी अफेअर केलं म्हणून इतर कर्मचारी खार खाऊन होते, पण पराग आणि वर्धाला इतरांची काहीच पडली नव्हती. त्या दोघांचंही खूप छान चाललं होतं. ऑफिसमधलं प्रोफेशनल लाईफ संपलं की दोघांचं सुंदर आयुष्य सुरू व्हायचं, एकमेकांसोबत  फिरणं, गप्पा मारणं, तासांन् तास फोनवर बोलणं यातून दोघांचंही प्रेम खुलत गेलं, रात्री वर्धाशी फोनवर उशीरापर्यंत गप्पा मारून झाल्यावर परागनं फोन ठेवला. झोपायला जाणार एवढ्यात फोन वाजला.

”HI कसा आहेस?”

मेसेज कोणाचा आहे हे परागला कळलं.

ती ऋतुजा होती. त्याची ऋतुजा, जिच्यावर त्यानं जीवापाड प्रेम केलं होतं ती. पण आताच तिने का मेसेज केलाय? तेही रात्री १ वाजता. ती ठिक तर असेल ना?

त्यानं पटकन रिप्लाय केला.

”मी ठिक आहे तू ठिक आहेस ना?”

”नाही मी अजिबात ठिक नाही. मला तुझी खूप आठवण येतेय पराग मी चुकले. खरंच चुकले मला माफ कर”

”अगं वेडे मी माफ केलंय तुला”

”पराग मला भेटायचंय तुला. भेटशील का मला प्लीज” ऋतुजाचा रिप्लाय आला.

”बच्चा झोप आता, आणखी किती जागणार आहेस व्हॉट्सअॅपवर. बिझी आहेस का?”  त्याला ऑनलाइन पाहून वर्धाने मेसेज केला.

”नाही ग, तो विनीत मेसेज करत होता” परागने खोटा मेसेज टाईप केला.

”ओके झोप लवकर, GOOD NIGHT, LOVE YOU” वर्धा मेसेज करून झोपी गेली.

हे काय केलं मी, परागनं हातातली उशी खाली फेकली.

परागला काहीतरी आठवलं, वर्धाचा हात हातात घेताना ऋतुजा कधीच आपल्यामध्ये येणार नाही, असं वचन दिलं होतं मी तिला आणिआता आपण तिच्याशी चक्क खोट बोललो.

”हॅलो रिप्लाय दे? भेटूया का आपण” ऋतुजाचा पुन्हा मेसेज आला.

”काय करू तिला रिप्लाय देऊ की वर्धाला खरं सांगून टाकू” पराग द्विधा मनःस्थितीत सापडला. परागनं फोन हातात घेतला आणि….

क्रमश:

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित