चेंबूर येथील आरसीएफ परिसरात तीन जणांनी एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांविरुद्ध ‘पोस्को’अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती आरसीएफ पोलिसांनी दिली. या घटनेमुळे चेंबूर परिसरात खळबळ उडाली आहे.

आरसीएफ परिसरात एकाच ठिकाणी राहणारे सलमान, शाबाज आणि इरफान या तिघांनी तेथेच राहणाऱ्या एका महाविद्यालयीन मुलीवर २५ मार्च रोजी बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. ही तरुणी सलमानची मैत्रीण असून २५ मार्च रोजी तो तिला मोटरसायकलवरून सायन येथे घेऊन गेला होता. त्यानंतर सलमान तिला घेऊन शाबाजच्या घरी आला. तेथे या दोघांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केले. या प्रकरणाची वाच्यता केल्यास बदनामी करू अशी धमकी या दोघांनी तिला दिली. पीडित तरुणीने हा प्रकार कोणालाच न सांगितल्याने हे दोघे आणि त्यांचा मित्र इरफान तिला धमकावत होते. घाबरलेल्या तरुणीने अखेर आपल्या आईला हा प्रकार सांगितला. आईने आरसीएफ पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध सामुहित अत्याचार, धमकावणे, विनयभंग करणे, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर या तिगांनाही अटक करण्यात आली. या तिघांना रविवारी सुटीकालीन न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.