मुंबईत सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्याची जबाबदारी असलेल्या ‘म्हाडा’ने २०१५-१६ मध्ये मुंबई व कोकण मंडळातर्फे तीन हजार घरे उपलब्ध करून देण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचबरोबर भविष्यात घरबांधणीसाठी जागेची व्यवस्था करण्यासाठी जमीन विकास व जमीन खरेदीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद ‘म्हाडा’च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
‘म्हाडा’चा २०१५-१६ चा ४६६९ कोटी ७६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी मांडण्यात आला. ७५५ कोटी रुपये तुटीचा हा अर्थसंकल्प आहे.
‘म्हाडा’च्या गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत सध्या राज्यभरात ६ हजार सदनिकांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. २०१५-१६ या वर्षांत परवडणाऱ्या दरातील ३ हजार घरे जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तर मुंबईत ११०० इमारतींची दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे.
पंतप्रधान अनुदान प्रकल्पाच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाच्या अनुदानापोटी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.