अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये शशिकला उर्फ बेबी पाटणकर आणि तिचा साथीदार धर्मराज काळोखे यांना अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आणखी पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांच्या  गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. त्यानंतर या सर्वांना शनिवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सर्वांना ४ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
 यामध्ये पोलीस निरीक्षक सुहास गोखले, पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सारंग, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ज्योतीराम माने, हेड कॉन्स्टेबल यशवंत पार्टे यांना गुन्हे शाखेतर्फे ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आझाद मैदान पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकातील आहेत. मात्र, याप्रकरणात पोलीसांतील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यापूर्वी २२ एप्रिलला बेबी पाटणकर आणि १५ मे रोजी तामिळनाडू येथून पॉलराज दुराईस्वामीला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे आता याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आठवर पोहचली आहे. तर, ९ मार्च रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धर्मा काळोखे याला सातारा पोलिसांनी अंमली पदार्थाच्या तस्करीत अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. काळोखे याच्या पोलीस लॉकर मध्ये १२ किलो एमडी अमली पदार्थ आणि तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे परदेशी चलन समोर आले होते. त्याला अमली पदार्थ पुरविणारी महिला म्हणून बेबी पाटणकरचे नाव पुढे आले होते. या महिलेला पकडण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने जंग जंग पछाडले होते. पोलिसांची दहा स्वतंत्र पथके कार्यरत असतानादेखील ती पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना बेबी पाटणकर कुडाळहून खासगी बसने मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली. समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरिष सावंत, पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड, निशिकांत विश्वकार आदींच्या पथकाने या बसचा माग घेत पनवेल येथे सापळा लावून बसमधूनच बेबी पाटणकरला अटक केली होती.