सोनेतस्करीची पाळेमुळे विमानतळ कर्मचाऱ्यांपर्यंत?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शौचालयाच्या जलवाहिनीमागच्या पोकळीत दडवण्यात आलेले तब्बल ७० लाख रुपये किमतीचे सोने हवाई गुप्तचर विभागाने शुक्रवारी जप्त केले. दुबईहून उतरलेल्या एका प्रवाशाने शौचालयाचे ‘फ्लश’चे बटण उचकटून त्यामागील मोकळय़ा जागेत हे सोने दडवले होते. या व्यक्तीबाबत असलेल्या संशयामुळे गुप्तचर विभागाने तपासणी केली असता, त्यांना हा प्रकार लक्षात आला. हे दडवलेले सोने विमानतळावरच काम करणाऱ्यांपैकी कुणाकरवी बाहेर नेले जाणार होते, असा संशन गुप्तचर विभागाला असून त्याआधारे चौकशी करण्यात येत आहे.

मोहम्मद अली मोहम्मद असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. मूळचा केरळच्या कासारगोडचा रहिवासी असलेला मोहम्मद दुबईतील एका दुकानात नोकरी करतो. त्याच्या सोनेतस्करीच्या उद्योगाबद्दल हवाई गुप्तचर विभागाला कल्पना असल्याने मोहम्मद याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. विमानतळावर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली. मात्र, त्यांना काहीच सापडले नाही. मोहम्मद विमानातून उतरल्यावर विमानतळावरील शौचालयात गेला होता, असे चौकशीत समोर आल्यानंतर संबंधित शौचालयाची तपासणी करण्यात आली. तेव्हा शौचालयाच्या भिंतीत बसवण्यात आलेल्या ‘फ्लश’च्या बटणामागील पोकळीतून भिंतीमागील मोकळय़ा जागेत त्यांना सोने आढळले. सुमारे ११६५ ग्रॅम वजनाची सोन्याची दहा बिस्कीटे अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.

शौचालयाच्या मागे जलवाहिन्यांसाठी मोकळी जागा आहे. जलवाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती करणारे कर्मचारीच तेथे जाऊ शकतात. गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शौचालय डागडुजीचे कंत्राट खासगी कंपनीकडे आहे. तिथले कर्मचारी परवानगी घेऊन मोकळया जागेत येऊ शकतात. त्यामुळे सध्या संशयाची सुई या कंत्राटी कामगारांवर आहे. त्यांच्यापकीच कोणीतरी मोहम्मदच्या कृत्यात सामील असावे, या दृष्टीने आता चौकशी करण्यात येत आहे.

विमानाच्या शौचालयातही सोने

शुक्रवारीच दुबईहून परतलेल्या एअर इंडियाच्या विमानातील शौचालयातून ११६५ ग्रॅम सोने बेवारस अवस्थेत आढळले. हे सोने पेपर नॅपकिन ठेवण्याच्या जागेत अत्यंत चपखलपणे दडविण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांमागील सूत्रधार एकच असावा,