नायर रुग्णालयात दिवसा उपचार घेऊन रात्री चोऱ्या करणाऱ्या एका अट्टल चोराला कांदिवली पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याजवळून सहा लॅपटॉप आणि हजारो रुपयांची रोकड जप्त केली. या चोराची कसून चौकशी करण्यात येत असून आणखी काही चोरीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मालाड येथे राहणारा अट्टल चोर उदय पाटील याला २००८ मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात एक पाय गमवावा लागला होता. त्यामुळे तो लंगडतच चालत होता. काही दिवसांनी त्याला मूत्रपिंडाचाही त्रास सुरू झाला. त्यामुळे तो नायर रुग्णालयात उपचार घेऊ लागला. चोऱ्या करण्याच्या सवयीमुळे त्याला नातेवाईकांनी घरातून हाकलून दिले होते. मूत्रपिंडाचा त्रास होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून तो नायर रुग्णालयात उपचार घेत होता. दिवसभर तो रुग्णालयातच असायचा आणि रात्री फिरायला जाण्याचे निमित्त करून रुग्णालयातून गायब होत असे.
गेल्या काही दिवसांमध्ये कांदिवली रेल्वे स्थानकाच्या आसपास चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पोलिसांनी या भागात गस्त वाढविली होती. मात्र कोणतेच धागेदोरे त्यांच्या हाती येत नव्हते. कांदिवली रेल्वे स्थानकाबाहेरील मोबाइलच्या दुकानाबाहेर पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान एक संशयीत व्यक्ती लंगडत फिरताना पोलिसांना दिसली. त्याच्या संशयास्पद हालचालींवरुन पोलिसांनी त्याला हटकले. घाबरलेल्या उदयने तेथून पळ काढला आणि तो एका इमारतीत शिरला. इमारतीच्या दरवाजाला त्याने टाळे लावले. टाळे फोडून पोलीस इमारतीत शिरले आणि त्यांनी उदयला पकडले. त्याच्याकडे सहा लॅपटॉप आणि रोख रक्कम सापडली. यापूर्वी उदयविरुद्ध चोरीच्या कांदिवली पोलीस ठाण्यात चार, तर मालाड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
रात्री चोरी केल्यानंतर मिळालेल्या पैशातून उदय नायर रुग्णालयात आपल्यावर उपचार करीत होता, असे पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले.