27 May 2016

बोगस शिधापत्रिकांची ‘आधार’वर बाजी!

‘आधार’ कार्डालाच शिधापत्रिकेचा आधार असल्याने बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी आधार कार्डाचा कोणताच उपयोग होणार

उमाकांत देशपांडे, मुंबई | December 20, 2012 6:47 AM

‘आधार’ कार्डालाच शिधापत्रिकेचा आधार असल्याने बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी आधार कार्डाचा कोणताच उपयोग होणार नाही. बोगस शिधापत्रिकांच्या आधारे वेगवेगळ्या पत्त्यांवर आधार कार्ड मिळविणे शक्य असून त्याला आळा कसा घालायचा आणि ती हुडकून कशी काढायची, यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. बांगलादेशी किंवा रहिवासी नसलेल्यांना शिधापत्रिका मिळत असून त्याआधारे आधार कार्डही घेतले जात आहे.
गेल्या चार-पाच वर्षांत राज्यात ४२ लाखाहून अधिक बोगस किंवा अपात्र व्यक्तींच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. बोगस शिधापत्रिकांच्या मुद्दय़ावर उच्च न्यायालयात याचिका सादर झाली आहे. बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी आधार कार्डवर आधारित शिधापत्रिकेची सक्ती करण्याची उच्च न्यायालयाची सूचना असून सरकारचे मत मागविले आहे. पण हा पर्याय अशक्य असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
आधार कार्ड मिळण्यासाठी निवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिका ग्राह्य़ धरली जाते. सुमारे ७०-८० टक्क्य़ांहून अधिक आधार कार्डासाठी शिधापत्रिकेचाच पुरावा सादर झाला आहे. आधार कार्ड जारी करणाऱ्या यंत्रणेकडे पुराव्याची छाननी करण्याची यंत्रणा नाही. घरोघरी जाऊन पुराव्यांची तपासणी होत नाही. केवळ शिधापत्रिका जारी करतानाच शिधावाटप विभागाचे निरीक्षक घरी जाऊन पत्त्याची तपासणी करतात. पण लाच दिल्यावर कोणालाही बोगस शिधापत्रिका दिल्या जातात. पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड आदी कोणत्याही ओळखपत्र, दाखल्यांसाठी शिधापत्रिकेचाच आधार घेतला जातो. या कोणत्याही प्राधिकरणाकडे किंवा आस्थापनेकडे घरोघरी जाऊन पुराव्यांची तपासणी करण्याची यंत्रणा नाही. पासपोर्टसाठी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणीच्या वेळीही शिधापत्रिका मागितली जाते. काही लाच देऊन शिधापत्रिका मिळत असल्याने त्याआधारे अन्य प्रमाणपत्रे व ओळखपत्रे त्याआधारे मिळतात. आधार कार्डाच्या वेळी छायाचित्र, अंगठय़ांचे ठसे घेतले जातात. पण मुंबईत वीज बिल किंवा शिधापत्रिका हा निवासाचा पुरावा दाखवून आधार कार्ड घेतले आणि पुण्यात किंवा अन्य शहरात तेथील वीजबिल किंवा शिधापत्रिका दाखवून वेगळ्या क्रमाकांने आधार कार्ड मिळविले, तर त्यांची छाननी कशी करणार, हा प्रश्न आहे. एकदा एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे काढले गेल्यावर पुन्हा देशात कोठेही ते घेतल्यास त्याची नोंद होणार नाही, अशा पध्दतीने आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र आदींची यंत्रणा राबविली तरच याला आळा घातला जाऊ शकतो. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले पाहिजे. पण एका व्यक्तीची अनेक पॅनकार्ड वेगवेगळ्या शहरांत किंवा एकाच शहरातही काढली गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेवर आधार क्रमांक नमूद करण्याची प्रक्रिया झाली, तरी बोगस किंवा अपात्र शिधापत्रिका आळा घालण्यासाठी त्याचा उपयोग होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.   

First Published on December 20, 2012 6:47 am

Web Title: adhar card insted bogus ration card