डिसेंबर ते फेब्रुवारीत मोठे कार्यक्रम; दहावी-बारावीच्या परीक्षांचाही पेच

डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७चा पहिला आठवडा या कालावधीत चार ते सहा मोठे जाहीर कार्यक्रम डोंबिवलीत होत आहेत. कार्यक्रमांची ही भाऊगर्दी आणि दहावी-बारावीच्या परीक्षा यांचा विचार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या आगरी युथ फोरमला करावा लागणार आहे.

सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा जानेवारी/ फेब्रुवारीत हे संमेलन आयोजित केले जाते. आत्तापर्यंतची साहित्य संमेलने याच कालावधीत झालेली आहेत. घुमान साहित्य संमेलन याला अपवाद ठरले होते. साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून ११ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल अर्थात संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर होणार आहे.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस डोंबिवली जिमखान्याचा ‘उत्सव’ तर याच कालावधीत आगरी युथ फोरमचा ‘आगरी महोत्सव’ असतो. डिसेंबर महिन्यातच चतुरंग प्रतिष्ठानचे ‘रंगसंमेलन’ डोंबिवलीत होत असते. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. वि. पेंढरकर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि नामांकित शल्यविशारद डॉ. यु. प्रभाकर राव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने २९ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रम डोंबिवलीत होणार आहे.  ५ फेब्रुवारीस नागरी सत्कार समिती-डोंबिवलीचा पुरस्कार वितरण व गौरव समारंभ आहे, तर २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचा ‘गोळवलकर गुरुजी’ पुरस्कार वितरण सोहळा मोठय़ा प्रमाणात डोंबिवलीत साजरा होणार आहे.

साहित्य संमेलनासाठी नोंदणी शुल्क भरून जे साहित्य रसिक येतात त्यांच्या निवासाची सोय संमेलन परिसरातील शाळा-महाविद्यालयात केली जाते. दहावी-बारावीच्या परीक्षांमुळे संमेलन परिसरातील शाळा-महाविद्यालयात निवासाची सोय करणे कठीण होणार आहे. तसेच काही संस्था या चार ते सहा मोठय़ा कार्यक्रमांच्या आयोजनात गुंतल्याने संमेलन आयोजनात मदत करण्यासाठी कार्यकर्ते, स्वयंसेवक यांची आणि परीक्षांमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उणीव भासण्याची शक्यता आहे. या सगळ्यांचा विचार संमेलन आयोजित करताना करावा लागणार आहे.

दरम्यान, संमेलनाध्यक्षाची निवड जाहीर झाल्यानंतर सुमारे एक ते दीड महिन्याच्या कालावधीनंतरच संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जातात. त्यामुळे साहित्य संमेलन आयोजनावर या कार्यक्रमांचा परिणाम होणार नाही, असा विश्वास साहित्य महामंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केला तर डोंबिवलीत होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांचा विचार करूनच साहित्य संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जातील, असे आगरी युथ फोरमच्या एका पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.