एरव्ही ‘कौन बनेगा करोडपती’ या ‘रिअॅलिटी शो’च्या माध्यमातून लोकांना प्रश्न विचारणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चनला प्रश्न विचारण्याची संधी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी मिळाली. ‘व्हच्र्युअल क्लासरूम’ उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या अमिताभशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
मुंबईमध्ये महापालिकेच्या एकूण ११९५ शाळा आहेत. ‘व्हच्र्युअल क्लासरूम’ उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात त्यापैकी ८० शाळांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पालिकेच्या ४०० शाळांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे एकाच वेळी ४०० शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवता येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. ‘व्हच्र्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अमिताभशी संवाद साधला. तुम्ही शाळेत कोणत्या बाकावर बसत होतात? तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी कधी शिक्षा केली होती का? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी अमिताभला विचारले. या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत अमिताभने आपले आयुष्यातील चढ-उताराचे अनुभव मुलांच्या समोर मांडले.
‘व्हच्र्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून महापालिका शाळा दर्जेदार होतील. त्याचा परदेशातील विद्यार्थ्यांनाही हेवा वाटेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, व्हच्र्युअल क्लासरूममध्ये सध्या आठवडय़ातून तीन दिवस विद्यार्थ्यांना शिकवले जाते. यामध्ये इंग्रजी, मराठी, गणितासह इतर विषयांबाबत विविध तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. या अत्याधुनिक क्लासमुळे मुलांचे मनोरंजकपद्धतीने शिक्षण होते, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.