सोनईत वाल्मिकी समाजातील तीन युवकांची निर्घृण हत्या, खर्डा गावात शाळेत शिकणाऱ्या दलित तरुणाचा खून, जवखेडामध्ये दलित कुटुंबातील आई-वडिल-मुलाची क्रूर हत्या, या साऱ्या घटना अहमदनगर जिल्ह्य़ाात घडल्या आहेत. याच समस्येच्या पाश्र्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी नगर जिल्हा दत्तक घेण्याचे ठरविले आहे. सामाजिक न्यायाची संकल्पना मनामनात रुजविण्याचा हा एक पथदर्शी प्रयोग असेल, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.
आदिवासी समाजातील ‘डाकिण’ या स्त्रीयांच्या शोषणाच्या भीषण प्रकाराविरोधात जनजागृती करण्यासाठी अंनिसने नंदूरबार जिल्हा दत्तक घेतला. गेल्या चार पाच वर्षांत त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. जातपचांयतच्या विरोधातही अंनिसने प्रबोधनाची चळवळ सुरु केली आहे. राज्यात सध्या घडणाऱ्या जातीय अत्याचाराच्या विरोधात तसाच एखादा प्रयोग करावा, असे अंनिसच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यानुसार नगर जिल्हा दत्तक घ्यायचा आहे. जातीय अत्याचाराला सामाजिक न्यायाची प्रस्थापना हेच उत्तर असू शकते. त्यासाठी शिक्षक, ग्रामस्थ, प्रशासन, पोलीस, सामाजिक संघटना, यांच्या सहभागातून हा प्रयोग यशस्वी करायचा आहे, असे पाटील म्हणाले.