काश्मीरमधून आवक वाढल्याचा परिणाम

काश्मीरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे तेथील सफरचंदाच्या व्यापाऱ्यांनी साठवणूक करण्याऐवजी मालाचा पुरवठा करण्याकडे भर दिल्याने मुंबईत सफरचंदाची आवक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे एरवी मुंबईत १४० ते १८० रुपयांना विकल्या जाणाऱ्या उत्तम प्रतिच्या सफरचंदाच्या किमती तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घसरल्या आहेत. काश्मीरच नव्हे तर हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या सफरचंदांचीही आवक वाढल्याने एकूणच हे महाग फळ आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडू लागले आहे.

काश्मीरी सफरचंदाला ‘डेलिशिअस’ म्हटले जाते. वाशीच्या घाऊक बाजारात १५ ते १६ किलोंची काश्मीरी सफरचंदाची पेटी या काळात गेल्या वर्षी १२०० ते १५०० रुपयांना विकली जात होती. मात्र, यंदा ही पेटी अवघ्या ७०० ते ८०० रुपयांना विकली जात आहे. किरकोळ बाजारात सफरचंद १५० ते १८० रुपये किलो दराने विकले जातात. मात्र, सध्या त्यांचे दर ८० ते १०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. काश्मीरमध्ये उत्पादित होणारी ‘डिलिशिअस’ किन्नवरी जातीची सफरचंदे लहान आकाराची आणि लाल सालीची असतात. ती बाजारात ७० ते ८० रुपये किलोंनी विकली जात आहेत. या शिवाय शिमला आणि हिमाचल या जातीची सफरचंदे १०० रु. किलोला विकली जात आहेत.

काश्मीरची डिलिशियस सफरचंदे ही खासकरुन ऑक्टोबर ते नोव्हेंबर या हंगामातच उपलब्ध असतात. मात्र, काश्मीरमधील तंग वातावरणामुळे त्यांचा साठा करून ठेवणे शक्य नसल्याने मुंबईत मोठय़ा प्रमाणावर माल विक्रीकरिता येत आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काश्मीरच्या परिस्थितीचा फटका हिमाचल प्रदेशातील सफरचंदांवर झाला आहे. तेथील रॉयल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सफरचंदाच्या किंमतीही त्यामुळे घसरल्या आहेत, असे एपीएमसीमधील घाऊक फळविक्रेते संजय पानसरे यांनी सांगितले.