काल (बुधवार) रात्री उशीरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अचानक नाजूक झाली होती. त्यामुळे काल रात्रीपासून सामान्य जनता आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.  मात्र, बाळासाहेबांना चोवीस तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. डॉक्टरांच्या उपचारांना त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिवसेना नेते सुभाष  देसाई यांनी दिली.  तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक बाळासाहेबांवर उपचार करत आहे. तसेच बाळासाहेबांना लावण्यात आलेला वेंटींलेटरही काढण्यात आला असून आता ते नैसर्गिकरित्या श्वासोच्छवास करत असल्याचे शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी सांगितले आहे. बाळासाहेबांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सुरू असलेल्या प्रार्थनांना यश येत असल्याचे सांगून सुभाष देसाईंनी सर्वांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे  शिवसैनिकांनी दाखवलेल्या संयमासाठी देखील त्यानी आभार प्रकट केले. असाच संयम शिवसैनिकांनी यापुढेही दाखवावा , अशी विनंतीही देसाई यांनी केली . या आधी सकाळी शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनीही  बाळासाहेब डॉक्टरांच्या उपचारांना उत्तम प्रकारे प्रतिसाद देत असल्याचे सांगितले होते.