गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायद्याचा भंग; घटनेतील समानतेच्या अधिकाराचीही पायमल्ली
मुलीच्या जन्माला कमी लेखत कोणत्याही स्वरुपात पुत्रप्राप्तीचा उपाय सुचविणे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही बीएएमएसच्या आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातून पुत्रप्राप्तीसाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्त्रीने करावयाच्या वेगवेगळ्या विधीचे उपाय सुचविण्यात आले आहेत. पूर्वजन्मीच्या कर्माचाही कसा संतानप्राप्तीवर परिणाम होतो, याचीही चर्चा त्यात आहे. त्यामुळे सरकारी अभ्यासक्रमानेच एकाच वेळी गर्भलिंग निदान प्रतिबंधक तसेच अंधश्रद्धानिर्मूलन कायद्याचा भंग केला आहे. त्याचबरोबर चातुर्वण्र्याचाही प्रचार करून जात, धर्म, वर्ण, लिंग या आधारावर समाजात भेदभाव निर्माण करण्यास प्रतिबंध करणाऱ्या राज्यघटनेचीही पायमल्ली करण्यात आली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता डॉ. सतीश डुंबरे यांना चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार बीएएमएसच्या अभ्यासक्रमात पुत्रप्राप्तीचा व जातिवाचक उल्लेख असल्याचे मान्य करून हा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे डॉ. डुंबरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
गेल्या काही वर्षांत स्त्रीभ्रूण हत्यांची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने २००३ मध्ये गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) हा गुन्हेगारांना कडक शिक्षेची तरतूद करणारा सुधारित कायदा केला. या कायद्याच्या कलम २२ मध्ये कोणतीही व्यक्ती, संस्था, जनुकीय समुपदेशन केंद्र, प्रयोगशाळा, किंवा चिकित्सा केंद्र यांना गर्भलिंग निदान व लिंग निवडीसाठी वापरावयाचे तंत्र याची जाहिरात, छापील पत्रके, संवादाद्वारे किंवा कोणत्याही स्वरूपात प्रसिद्ध करण्यास मनाई करण्यात आली आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासाची आणि दहा हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता असलेल्या बीएएमएसच्या अभ्यासक्रमात पुत्रप्राप्तीच्या उल्लेखामुळे पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बीएमएसच्या साडे चार वर्षांच्या अभ्यासक्रमांतील विषयांची माहिती देण्यात आली आहे. त्यात चरकसंहिता या विषयाचे दोन पेपर आहेत. त्यातील शरीरस्थानम् विभागातील गर्भ आणि गर्भिणी प्रकरणात पुत्रप्राप्तीसाठी पुसंवन विधी व पुत्रकामेष्टी यज्ञाची चर्चा करण्यात आली आहे. पुत्रकामेष्टीमध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्त्रीने पुत्रप्राप्तीसाठी कोणते विधी करावेत, हे सांगितले आहे.

चरक संहिता हा ग्रंथ तीन हजार वर्षांपूर्वीचा आहे. या अभ्यासक्रमातील तो मजकूर आला आहे. परंतु कायद्याने निषिद्ध ठरविलेला पुत्रप्राप्ती व जातिवाचक उल्लेख चुकीचा आहे. सेंट्रल कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ही सर्वोच्च संस्था आयुर्वेदाचा अभ्यासक्र ठरविते. या संस्थेची ३, ४ व ५ जूनला बैठक आहे. त्यावेळी विद्यापीठाच्या वतीने हा आक्षेपार्ह मजकूर वगळण्याचा प्रस्ताव मांडला जाईल
– डॉ. सतीश डुंबरे, अधिष्ठाता, आयुर्वेद विभाग-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…