महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी मुंबई महानगरपालिकेच्या पर्युषण पर्वातील मांसविक्री बंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली. ते मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने या सगळ्या राजकारणाला सुरूवात केली आहे.  या सगळ्या वादाला हिंदू विरुद्ध जैन असा रंग देण्यात येत असल्याचा आरोप यावेळी राज यांनी केला. पालिकेला पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी घालायची असेल तर मग श्रावणात, नवरात्रात, गणपतीत अशी मागणी झाल्यास पालिकेला चालेल का, असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रात काय करायचे ते जैनांनी ठरवू नये. मांसविक्रीवर बंदी घालायला महाराष्ट्र हा काही गुजरात नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही कसलाही दिवस पाळण्याची गरज नाही. पालिकेने परवानगी नाकारली असली तरी पर्युषण काळात मांसविक्रेत्यांना आम्ही संरक्षण पुरवू, असे राज यांनी सांगितले. जैन समाजाने आमच्यावर संघर्षाची वेळ आणू नये. संघर्ष झाला तरी तो एकतर्फीच होईल, असा इशाराही राज यांनी दिला.
२६ सप्टेंबर १९९३ रोजी जेव्हा लातूरला भूकंप झाला त्यावेळी राज्यातील जैन, गुजराती समाजाकडून पिडीतांना मदत केली गेली नाही. त्यानंतर जेव्हा हीच वेळ गुजरातमधील भूजवर आली तेव्हा महाराष्ट्रातील गुजराती जनतेने भरभरून मदत केली. आत्ताही महाराष्ट्रात दुष्काळ पडला असून ग्रामीण भागात मदतीची गरज असताना या समाजाकडून शेतकऱ्यांना मदत केली जात नाही. यावरून कळते की, हा समाज महाराष्ट्रात राहत असला तरी त्यांचे मन मात्र आपापल्या राज्यातच आहे, असे राज यांनी सांगितले.