कांजूर येथील ‘नेहरूनगर महापालिका शाळे’च्या जीर्ण व खिळखिळीत झालेल्या इमारतीतील स्वच्छतागृहाचा स्लॅब कोसळल्याने येथे शिकणाऱ्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधींकरिता शेजारच्या पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा आसरा घ्यावा लागत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना तर याही स्वच्छतागृहात जाता येत नाही. त्यामुळे, त्यांची कुचंबणा होत आहे.
१९७१मध्ये बांधण्यात आलेल्या या बैठय़ा शाळेची इमारत इतकी पडझडीला आली आहे की वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून बसावे लागते. पत्र्याचे छप्पर असलेली ही शाळेत पावसाळ्यात नेहमीच गळत असते, तर उन्हाळ्यात पत्रे तापल्याने वर्गात चांगलेच उकडते. वर्गातील फळ्यांच्या लाकडी चौकटीच उखडून गेल्या आहेत. ठिकठिकाणी वायरी लोंबकळत आहेत. तसेच, शाळेच्या भिंतींना मारलेला रंगच काय तर चुनाही निघून गेल्याने त्या ओंगळवाण्या वाटू लागल्या आहेत. स्वच्छतागृहांची अवस्था तर त्याहून बिकट. शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहाचा दरवाजा इतका लहान आहे की वाकून पाहिल्यास आत काय चालले आहे ते कुणालाही दिसावे.

हे कमी म्हणून की काय, जून महिन्यात स्वच्छतागृहातील स्लॅबचा एक भाग कोसळल्याने ते वापरण्यास धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेव्हापासून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्याचा वापरच करता येत नाही आहे. पालिका शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्चर व मेंटेनन्स विभागाने पाहणी करून स्वच्छतागृह धोकादायक म्हणून घोषित केले आहे. तेव्हापासून मुलांना नैसर्गिक विधींकरिता शाळेच्याच आवारात असलेल्या पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थिनी आणि शिक्षिकांची तर अवस्था याहून वाईट आहे. कारण, गुंडापुंडांचा वावर असलेल्या या स्वच्छतागृहात जायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.या शाळेत हिंदूी, इंग्रजी या माध्यमाच्या शाळा चालविल्या जातात. हिंदी माध्यमाचे १२९ आणि इंग्रजी माध्यमाचे केजीपासून आठवीपर्यंतचे ४१५ विद्यार्थी येथे शिकत आहेत. इंग्रजीचे नववी-दहावीचे वर्गही सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे. परंतु, शाळेची इतकी दुरवस्था असेल तर पालक आपल्या मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवण्यास धजावणार नाहीत, असे येथील शिक्षक सांगतात. २०१२पासून शाळेचे मुख्याध्यापक दुरुस्तीकरिता पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत आहेत. परंतु, त्याला अद्याप प्रतिसाद दिला गेला नाही. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक सतीश भुयगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेच्या दुरुस्तीकरिता पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे उत्तर दिले.

पाण्याच्या टाक्या उघडय़ावर
शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्यांचीही देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. मे महिन्यात कधीतरी या टाक्यांची स्वच्छता केली गेली होती. मात्र, या टाक्या शाळेबाहेर उघडय़ावर असल्याने त्यात लगेचच घाण साचते. आताही त्यात शेवाळे माजले आहे. त्यातच मुलांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेला प्युरिफायर बंद पडल्याने विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वानाच अस्वच्छ व दरुगधीयुक्त पाणी प्यावे लागते आहे.

दुरूस्तीची ठिगळं लावणार तरी कुठून?
या शाळेच्या दुरूस्तीचा घाट पालिकेने घातला आहे. परंतु, या शाळेची सध्याची अवस्था पाहता दुरूस्ती करून काहीच उपयोग नाही. कारण, इतक्या पडझड झालेल्या इमारतीला दुरूस्तीची ठिगळं लावणार तरी कुठून कुठून? दुदैवाने ही साधी बाब पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही. या शाळेत पुढील वर्षीपासून नववी-दहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्या करिता अधिक वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा पुरवावी लागणार आहे. त्यामुळे, भविष्याचा विचार करून दुरूस्तीवर खर्च करण्याऐवजी या ठिकाणी शाळेला प्रशस्त इमारत उभी करून द्यावी.
– शिवनाथ दराडे, सदस्य, पालिका शिक्षण समिती.