मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी यंत्र बसवणार
महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये लवकरच मालमत्ता कर, पाणीपट्टी यासह विविध कर डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून रोख रक्कम अथवा धनादेश घेऊन लांबलचक रांगेत तिष्ठत उभे राहावे लागणार नाही.
पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये मालमत्ता कर, पाणीपट्टी यासह विविध करांची देयके स्वीकारली जातात. ही देयके रोख रक्कम अथवा धनादेशांच्या स्वरूपात स्वीकारली जातात. आजकाल नागरिक डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर ऑनलाइन शॉपिंग किंवा अन्य खरेदी व्यवहार करू लागले आहेत. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रांमध्ये मालमत्ता कर, पाणीपट्टीसह अन्य सर्व करांची रक्कम डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून स्वीकारावी, अशी मागणी नगरसेवक परमिंदर भमरा यांनी १३ जुलै २०१५ रोजी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून केली होती. या ठरावाच्या सूचनेला सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता.
नागरिकांना लवकरच स्टेट बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कराच्या रकमा नागरी सुविधा केंद्रात भरता येतील, असे पालिका आयुक्तांना या ठरावाच्या सूचनेवर दिलेल्या अभिप्रायात स्पष्ट केले आहे. नागरिकांना डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करभरणा करता यावा यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक व एचडीएफसी बँकेने पालिकेला प्रस्ताव सादर केला होता. या योजनेनुसार येस बँक आणि एचडीएफसी बँकेत जमा होणारी कराची रक्कम दुसऱ्या दिवशी पालिकेच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत. त्यामुळे पालिका मुख्यालय आणि २४ विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने उपलब्ध केलेल्या जीपीआरएस पॉज मशीनमार्फत डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे देयकांची रक्कम स्वीकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी नागरी सुविधा केंद्रांमधील संगणकांमध्ये आवश्यक त्या सुधारणा व चाचण्या घेण्यात येत असून लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.