मध्य रेल्वेने परळ येथील कार्यशाळेत संपूर्ण वर्षभरात २० हजार लिटर जैव डिझेल तयार करून हरित इंधन निर्मिती व वापराचा आदर्श घालून दिला आहे. परळ येथील कार्यशाळेत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही ऑगस्ट २०१४ मध्ये जैव डिझेल तयार करण्यास सुरुवात केली. महिन्याला १५०० लिटरचे लक्ष्य होते. आता खाद्य तेले व इतर कच्च्या मालाचे प्रमाण कमी असल्याने उत्पादनात तुटवडा आहे.
यात वापरलेल्या खाद्य तेलाचे रूपांतर जैव डिझेलमध्ये केले जाते. त्या रासायनिक प्रक्रियेत ट्रायग्लिसराईड रेणू हे अतिरिक्त अल्कोहोलशी अभिक्रिया करतात व ती उत्प्रेरकाच्या माध्यमातून घडवली जाते. त्यातून फॅटी इस्टर्स व ग्लिसरिन ही उपउत्पादने तयार होतात. अल्कोहोलचे फॅटी इस्टर म्हणजे जैव डिझेल असते. भारतीय रेल्वे स्वच्छ पर्यावरणासाठी प्रयत्नशील असून जैव डिझेल हा त्याचा एक भाग आहे. चार हजार डिझेल इंजिनांसाठी वापरले जाते.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, आम्ही हॉटेल मालकांशी संपर्क साधून वापरलेले तेल घेणार आहोत, पण यात जर ते तेल अनेकदा वापरले असेल तर त्यापासून बनणाऱ्या जैव डिझेलचा प्रवाहीपणा कमी असतो त्यामुळे ते वापरण्यात अडचणी येऊ शकतात. काळ्या सोन्याकडून हरित सोन्याकडे आम्ही वळलो आहोत असे सांगून ते म्हणाले की, जैव डिझेल हे भावी काळातील इंधन आहे त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार संधी तयार होतील.
शिवाय उर्जा सुरक्षा, स्वच्छ हवा व परकीय चलनात बचत ही त्याची वैशिष्टय़े आहेत. जैव डिझेल हे सुरक्षित असते. ते प्रदूषण कमी करते त्यात कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स यांचा समावेश आहे.