पालिका रुग्णालयांत कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई

कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात उंदराने रुग्णांना कुरतडल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत प्रशासनाने पालिका रुग्णालयात कचरा आणि उष्टेखरकटे टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अस्वच्छतेमुळे उंदीर आणि भटक्या कुत्र्यांचा रुग्णालयातील वावर टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या डोळ्याला, तर अन्य एका महिला रुग्णाच्या पायाच्या अंगठय़ाला उंदराने चावा घेतल्याचे उघडकीस आले असून या घटनेनंतर या रुग्णालयात स्वैरपणे फिरणाऱ्या उंदरांचा रुग्णांनी धसका घेतला आहे. त्यामुळे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. केवळ उंदीरच नव्हे, तर भटकी कुत्री, मांजरांचाही या रुग्णालयात वावर असल्याचे या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. रुग्णांना उंदीर चावल्याच्या घटनेचे पडसाद गुरुवारी पालिका सभागृहात उमटले. मुंबईत पसरलेली डेंग्यूची साथ, कचरा आणि दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि रुग्णालयांमधील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत नगरसेवक अश्रफ आझमी यांनी पालिका प्रशासनावर टीकास्र सोडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील दोन महिला रुग्णांना उंदीर चावल्याच्या घटनेवर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रकाशझोत टाकला. अनेक नगरसेवकांनी या घटनेबद्दल प्रशासनाला दोषी ठरवत रुग्णालयांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली.

रुग्णालयात रुग्णांसोबत राहणारे नातेवाईक बाहेरून खाद्यपदार्थ आणून तेथेच खातात. उष्टेखरकटे तेथेच टाकतात. तसेच काही जण रुग्णालयाच्या आवारात कचरा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रुग्णालयात कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी पालिका सभागृहात दिली. रुग्णालयांमध्ये स्वच्छता राखण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांवरही आहे आणि त्यांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन कुंदन यांनी या वेळी केले.

रुग्णालयाची पाहणी करताना उंदरांनी चावा घेतलेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस करण्यात आली. या रुग्णांची जबाबदारी पालिकेची असून त्यांना स्वतंत्र खोलीत ठेवण्यात येणार आहे. या रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यांची दखल घेऊन उंदरांचा बंदोबस्त केला होता. मात्र तरीही फॉलसिलिंगमधून उंदरांचा वावर सुरूच असल्याचे आढळून आले आहे. हे रुग्णालय सध्या हमी कालावधीत आहे. त्यामुळे उंदरांनी केलेली बिळे, फॉलसिलिंगला पडलेल्या भोकांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे, असेही कुंदन यांनी स्पष्ट केले.

भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त

रुग्णालयात पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीमध्ये उंदीर, झुरळांचा बंदोबस्त करण्याच्या औषधांचाही समावेश असून रुग्णालयांनी ती तातडीने उपलब्ध करून दिली जातील. खासगी कीटकनाशक फवारणी करणाऱ्या संस्थांमार्फत रुग्णालयांमध्ये औषध फवारणी करण्यात येईल, असे सांगून त्या म्हणाल्या की, रुग्णालयांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याचे आढळले असून त्यांचा बंदोबस्त करण्याचा विचार प्रशासन करीत आहे.