सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोन सत्ताकेंद्रांमुळे पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत गोंधळ उडाला असून, त्याचे पक्षावर परिणाम होतात. यामुळेच राहुल यांनी लवकरच अध्यक्षपद स्वीकारावे, असा नेत्यांचा आग्रह असला तरी सोनियांनीच अध्यक्षपद सांभाळावे, अशी भूमिका पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी मांडली आहे.
पक्षाच्या पातळीवर होणारे काही निर्णय राहुल गांधी यांना मान्य होत नाहीत. त्यांनी विरोध केल्यावर काही वेळा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या निर्णयात बदल करतात. हा घोळ गेले अनेक दिवस सुरू आहे. दोन सत्ताकेंद्रांमुळे पक्षात गोंधळ उडतो. केरळमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप किंवा बदनाम झालेल्या काही माजी मंत्र्यांना उमेदवारी देण्यास राहुल गांधी यांनी विरोध केला होता. पण मावळते मुख्यमंत्री ओमन चंडी आडून बसल्याने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी चंडी यांचा हट्ट पुरा केला. पंजाबमध्ये अमरिंदरसिंग यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यास राहुल यांचा विरोध होता, पण सोनियांच्या मध्यस्थीने राहुल यांचा नाइलाज झाला. अलीकडच्या काळात अशी अनेक उदाहरणे असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते.
सोनियांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीस एक वर्षांची मुदतवाढ गेल्या सप्टेंबरमध्ये देण्यात आली होती. राहुल यांच्याकडे अध्यक्षपद सोपविले जाणार, अशी चर्चा गेली दोन वर्षे सुरू आहे. सोनियांची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच पुढील महिन्यात अ. भा. काँग्रेसची बैठक बोलावून राहुल यांचा राज्याभिषेक करण्याची चर्चा आहे. राहुल यांच्याकडे पक्षाची सारी सूत्रे सोपावून त्यांच्या कलाने पक्षाचा कारभार करण्यास वाव द्यावा, मग त्यांच्या नेतृत्वाचा अंदाज येईल, असेही काँग्रेसमध्ये बोलले जाते.
कर्नाटक,हिमाचलमध्ये सत्ता राखण्याचे आव्हान
सहा राज्यांमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता असून पुद्दुचरीमध्ये कालच सत्ता मिळाली आहे. या सात राज्यांमध्ये लोकसभेचे फक्त ३६ मतदारसंघ आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कारभारावरून फार काही चांगली प्रतिक्रिया ऐकू येत नाही. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळण्याबाबत काँग्रेसमध्येच साशंकता आहे.