कुर्ला, शीव आणि परळ येथील नव्या प्लॅटफॉर्मचे काम

यंदाच्या अर्थसंकल्पात एमयुटीपी-३साठीच्या निधीबरोबरच एमयुटीपी-२ योजनेअंतर्गत असलेल्या प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद झाल्यामुळे या योजनेतील विविध प्रकल्पांना चालना मिळाली आहे. सीएसटी-कुर्ला यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या तीन आठवडय़ांपासून जोरात सुरू झाले आहे. या कामाचा पहिला टप्पा परळ टर्मिनसपर्यंत असून त्यासाठी परळ, शीव आणि कुर्ला या तीन ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म उभारणीसाठी हे काम सुरू आहे. विशेष म्हणजे कुर्ला येथे हार्बर मार्गासाठी उन्नत प्लॅटफॉर्म होणार असून त्यासाठीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे.

उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी सीएसटी ते कल्याण यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प एमयुटीपी-२ योजनेत आखला होता. या प्रकल्पातील दिवा-कल्याण आणि ठाणे-कुर्ला या दोन टप्प्यांमधील काम पूर्ण झाले आहे. ठाणे-दिवा आणि सीएसटी-कुर्ला या दोन महत्त्वाच्या टप्प्यांदरम्यानची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी गेल्या वर्षी १३२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदाही या प्रकल्पांसाठी १२०० कोटी रुपये अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या कामांना वेग आला आहे.

गेल्या तीन आठवडय़ांपासून कुर्ला स्थानकाच्या पूर्वेकडे असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक ९ आणि १० येथे जोरदार कामे सुरू आहेत. या प्लॅटफॉर्मवरून पूर्वी कुर्ला-मानखुर्द लोकल सोडली जात होती. गेल्या काही वर्षांपासून हे प्लॅटफॉर्म ओस पडून आहेत. आता या प्लॅटफॉर्मच्या जागी हार्बर मार्गासाठीचे उन्नत प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत. या उन्नत प्लॅटफॉर्मच्या उभारणीसाठी खांबांचा पाया तयार करणे, याआधी या भागात असलेले जुने रूळ आणि लाकडी स्लीपर्स उखडणे ही कामे सध्या सुरू आहेत. विशेष म्हणजे येथे कुल्र्याहून पनवेलकडे गाडय़ा सोडण्यासाठी टर्मिनस प्लॅटफॉर्मही बनवण्यात येणार आहे. कुल्र्याशिवाय शीव स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या पश्चिम दिशेला आणि परळ स्थानकात मध्य व पश्चिम रेल्वेच्या मध्ये असलेल्या जागेत कामांना वेग आला आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी साडेचार ते पाच वर्षे लागणार असल्याचा अंदाज आहे.