सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवाबाबत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन अनेक दहीहंडी उत्सवांनी केले. मात्र मुंबई-ठाण्यात पोलिसांनी त्याकडे चक्क डोळेझाक केल्याचे दिसून आले. कारवाई करू, एवढेच आश्वासन दोन्ही ठिकाणच्या पोलिसांनी दिले.
मुंबईत अवघा एकच गुन्हा..
यंदा दहीहंडी उत्सवावर सर्वोच्च न्यायालयाने अनेक बंधने घातली होती. त्यात १२ वर्षांखालील मुलांचा समावेश न करणे, आवाजाची मर्यादा ६५ डेसिबल ठेवणे तसे गोविंदांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्तीचे करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनीही न्यायालयाच्या निर्देशांची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु केवळ मेघवाडी येथील ओम साईराम गोविंदा मंडळावर बालगोविदांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मंडळाचा अध्यक्ष चेतन खेतले याला अटक करण्यात आली होती. या मंडळाने १० वर्षांच्या बालगोविंदास सातव्या थरावर चढविले होते. हा अपवाद वगळता शहरात अन्य कुठेच कारवाई झालेली नाही.  आम्ही उत्सवांचे चित्रिकरण केले असून त्याची तपासणी करून नंतर आयोजकांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात एकही नाही!
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पोलिसांच्या डोळ्यादेखत पायदळी तुडवून दहीहंडी उत्सवात मुजोरीचे थर रचणाऱ्या ठाण्यातील एकाही आयोजकाविरोधात २४ तास उलटूनही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले नव्हते. अशा मंडळांची माहिती गोळा केली जात असून ती न्यायालयापुढे सादर करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र यामुळे मुजोर मंडळांना त्यांची बाजू मांडण्यासाठी तब्बल दोन महिन्यांची मुदत मिळणार आहे.
ठाण्यात यंदाही दहीहंडीचा धांगडधिंगा करताना आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वच आदेश पायदळी तुडविले. दहीहंडीची उंची, थरातील १२ वर्षांखालील मुले आणि आवाजाची पातळी आदी सर्वच निकषांचे उल्लंघन होत असताना पोलीस ते निमूटपणे पाहत होते. दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत एकाही मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने पोलीस कारवाईबाबत संशय व्यक्त होऊ लागला आहे.
आयोजकांमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि नगरसेवक रवींद्र फाटक आदींचा समावेश असल्याने कारवाईची भाषा करणाऱ्या ठाणे पोलिसांची हतबलता दिसून आली.
किचकट कार्यपद्धती?
दहीहंडी फोडण्यासाठी १२ वर्षांखालील मुलाला थरावर चढविल्याची तक्रार अद्याप कुणीही केली नाही. सकाळपर्यंत २२ मंडळांनी आवाजाची पातळी ओलांडल्याची माहिती आली होती. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी सांगितले.
यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याचे वरिष्ट पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, गेल्या वर्षी आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी दुसऱ्याच दिवशी ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे कसे दाखल केले, याचे स्पष्टीकरण एकही अधिकारी देऊ शकला नाही.
डॉ. बेडेकरांचे खरमरीत पत्र..
दहीहंडी उत्सवात पोलिसांची अगतिकता बघून अतीव दु:ख झाले. पोलिसांनी बघ्याची घेतलेली भूमिका त्यांची असहायता सांगून गेली. हा विजय राजकारण्यांच्या मस्तवाल अरेरावीचा नसून स्वाभिमानशून्य आणि भ्रष्टाचारांनी दुबळ्या झालेल्या पोलीस यंत्रणेचा आहे, अशा भाषेतील खरमरीत पत्र  ठाण्यातील डॉ. विजय बेडेकर यांनी पोलीस आयुक्त विजय कांबळे यांना लिहिले आहे.