प्रत्येकी २५-३० उत्तरपत्रिका तपासणेच शक्य

मुंबई विद्यापीठाच्या पूर्णवेळ मूल्यांकनाच्या दुसऱ्या दिवशीही हजारो प्राध्यापक एकाच वेळी मूल्यांकन करत असल्यामुळे जवळपास तासभर काम संथगतीने सुरू होते. उत्तरपत्रिका डाऊनलोड अपलोड होण्यामध्ये बराच कालावधी लागत असल्यामुळे दिवसभर प्राध्यापक मूल्यांकनाच्या कामाला जुंपूनही त्यांना २५-३० उत्तरपत्रिका तपासण्यामध्ये यश आले आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या मूल्यांकनाचे काम आजही सुमारे एक लाखांच्या आसपास झाले आहे.

निकाल जाहीर होण्याची अंतिम मुदत अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या कामाला वेग आणण्यासाठी विद्यापीठाची दमछाक होत आहे.

सकाळच्या वेळेत वेगाने उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम सुरू होते. परंतु १२ वाजण्याच्या सुमारास उत्तरपत्रिका डाऊनलोड आणि अपलोड होण्याचे काम संथगतीने होऊ लागले. एकाच वेळी सुमारे ४ हजार शिक्षक मूल्यांकनाचे काम करत असल्यामुळे जवळपास तासभर हे काम संथगतीने सुरू होते. त्यामुळे दिवसभर मूल्यांकनाचे काम करत असूनही प्राध्यापकांचा दिवसाकाठी २५-३० उत्तरपत्रिका तपासणे शक्य झाले आहे. मंगळवारी मात्र सर्वच केंद्रामध्ये जास्तीत जास्त प्राध्यापकांनी मूल्यांकनासाठी हजेरी लावली होती. त्यामुळे इतर वेळी रिकामे असणाऱ्या अशा मुंबईबाहेरील केंद्रावर सर्व संगणकांवर काम जोरात सुरू होते. असे असले तरी विद्यापीठाला मंगळवारी एक लाखांच्या वर उत्तरपत्रिका तपासणे शक्य झालेले नाही. आता पूर्णवेळ कामाचे केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळामध्येही अशाच संथगतीने काम होत राहिले तर सर्व उत्तरपत्रिकांचे वेळेत मूल्यांकन करणे विद्यापीठाला शक्य नाही.