शासनाकडून आदर्श शिक्षक ते महाराष्ट्रभूषण किंवा अन्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात. असे पुरस्कार देताना पुरस्कृत व्यक्तीचा महिलांबाबतचा दृष्टिकोन कसा आहे याचाही विचार व्हावा आणि त्यासाठी निश्चित असे धोरण आखावे, अशी शिफारस निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आपल्या महिला सुरक्षेबाबतच्या चौथ्या अंतरिम अहवालात शासनाला केली आहे.  पुरस्कृत करण्यात येणारी व्यक्ती व्यसनी, गुन्हेगार वृत्तीची आहे काय, हे तर बघावेच; परंतु त्याहीपेक्षा माहिलांबाबत त्याची दृष्टी आणि वृत्ती व संवेदनशीलता यांचाही विचार होणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना आदर्श म्हणून समाजासमोर प्रस्तृत केले जाते. त्याला राजमान्यता प्रदान केली जाते. त्यामुळेच त्या व्यक्तीचे एकूणच चरित्र व चारित्र्य तसेच लोकमानसातील त्याची प्रतिमा यांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, असे समितीने नमूद केले आहे.
कुमारी मातांच्या अपत्यांना आईच्या जातीच्या आधारे सवलती देणे, गर्भाशय भाडय़ाने देण्याला कायदेशीररीत्या आळा घालणे, हुंडा घेण्यात आला की नाही हे शपथपत्रावर जाहीर करणे, मोबाइल, सोशल नेटवर्किंग साइट्सवर आवश्यक ते र्निबध घालण्यासाठी तरतूद आदी महत्त्वाच्या शिफारशी समितीने अहवालात केल्या आहेत.