सर्वाधिक पावसाचा कालावधी असलेले जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने कोरडे गेल्याने महिनाअखेरीस देशपातळीवरील तूट १२ टक्क्यांवर गेली आहे. फक्त सहा राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ ६९ टक्के पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यात पावसाचा फारसा भरवसा देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वेधशाळेने नोंदवली आहे.
पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी पाऊस पडेल, अशी अपेक्षा असली तरी ऑगस्टअखेरीस पावसाचे चित्र फारसे आशादायी नव्हते. जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या केवळ सहा राज्यांत पावसाने सरासरीपेक्षा जास्त कामगिरी केली आहे. त्यातही जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पावसाची सरासरीच मुळात कमी आहे.
इतर राज्यांमध्ये हिमालयाच्या पायथ्याखालची राज्ये तसेच दक्षिण भारतातील राज्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे. महाराष्ट्रातील पावसाची तूट ३१ टक्क्यांवर गेली आहे. कोकणात ३२ टक्के, मध्य महाराष्ट्रात ३९ टक्के, मराठवाडय़ात ४९ टक्के तर विदर्भात १३ टक्के तूट आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश (३४ टक्के तूट), हरयाणा (३० टक्के), चंदिगढ (३५ टक्के), पंजाब (३१ टक्के), तेलंगणा (२५ टक्के), कर्नाटक (२६ टक्के) आणि केरळ (३१ टक्के) या राज्यांनाही पावसाची तूट जाणवते आहे.
सध्या ईशान्य भारतात मान्सून प्रभावी असून ईशान्य भारतातील सर्व राज्यांसह सिक्कीम आणि प. बंगाललाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात कोकणात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात तुरळक सरींची शक्यता आहे.

सप्टेंबरकडून आशा का नाहीत?
गेल्या शंभर वर्षांतील भारतातील मान्सूनच्या नोंदीवरून जूनमध्ये १८ टक्के, जुलैमध्ये ३३ टक्के, ऑगस्टमध्ये २९ टक्के तर सप्टेंबरमध्ये एकूण पावसाच्या २० टक्के पाऊस पडतो. पहिल्या तीन महिन्यात ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता असते. त्यापैकी ८८ टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण सरासरी ८४ टक्के राहील असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने नोंदवला होता. त्यानुसार पावसाचे प्रमाण कमी राहिले तर सप्टेंबरअखेर पावसाची तूट आणखी वाढेल.