खोटय़ा पदवी प्रकरणावरून दिल्लीत जितेंद्रसिंग तोमर यांना अटकेनंतर राजीनामा द्यावा लागला असतानाच राज्यात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात खोटी शैक्षणिक माहिती पुरविल्याचा आरोप करीत काँग्रेसने लोणीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, हे सारे आरोप लोणीकर यांनी फेटाळून लावले.
मराठवाडय़ातील परतूरचे भाजपचे आमदार असलेल्या बबनराव लोणीकर यांनी २००४, २००९ आणि २०१४ या तीन निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये वेगवेगळी माहिती दिली आहे. २००४ आणि २००९ च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए प्रथम वर्ष अशी शैक्षणिक माहिती सादर केली होती. पण २०१४ च्या निवडणुकीत शिक्षण इयत्ता पाचवी अशी माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. तसेच लोणीकर यांच्या वेबसाइटवर बी.ए. असा उल्लेख आहे. दिल्लीत आपचे तोमर यांना खोटय़ा माहितीच्या आधारे पोलिसांनी अटक केली. या कारवाईचे भाजपने समर्थन केले आहे. भाजपचे मंत्री लोणीकर यांनी तीन निवडणुकांमध्ये खोटी शैक्षणिक माहिती सादर केली आहे. आता भाजप लोणीकर यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार, असा सवाल काँग्रेसने केला आहे. प्रतिज्ञापत्रात शिक्षणाच्या संदर्भात विसंगत माहिती सादर करून लोणीकर यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. यामुळेच त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी सावंत यांनी केली आहे.

२००४ आणि २००९ च्या निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर करताना मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील बीएच्या पात्रता परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी मी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातून ही पात्रता परीक्षा उत्तीर्णही झालो होतो. त्यानंतर मला बीएच्या अभ्यासक्रमासाठी रितसर प्रवेशही मिळाला. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव मी बीएच्या परीक्षेत पास होऊ शकलो नाही. मी २०१४ साली निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माझ्या मुळ शिक्षणाचा म्हणजे पाचवी पास असल्याचा उल्लेख केला. यासंबंधी काहीजणांचा गैरसमज झाला असून मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटून हे गैरसमज दूर करण्यास तयार आहे. – बबनराव लोणीकर