मुंबई मुंबईतल्या एका नृत्य दिग्दर्शकाच्या व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याला लुटण्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. आपल्या मागे दुसऱ्या टोळीचे गुंड लागले आहेत असे सांगत या गुंडांनी त्याच्या गाडीत प्रवेश मिळवून त्याला तब्बल तीन तास शहरात फिरवले. नंतर त्याच्या एटीएम कार्डद्वारे सुमारे सत्तर हजार रुपये काढून त्याला लुटले. विशेष म्हणजे लुटारूंनी वापरलेले पिस्तुल खेळण्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
झाकीर शेख (४१) हे एका नृत्य दिग्दर्शकाकडे व्यवस्थापकाचे काम करतात. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ते आपल्या जुहू येथील कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. ईर्ला सिग्नलला गाडी थांबली असता दोन इसम त्यांच्याकडे आले. आमच्या मागे काही गुंड लागले आहेत, असे सांगत जबरदस्तीने त्यांनी शेख यांच्या गाडीत प्रवेश मिळवला. हे दोघेही २५ ते ३० वर्ष वयोगटातले होते. ‘आम्हाला वांद्रे येथे सोड’, असे त्यांनी शेख यांना सांगितले. वांद्रे आल्यानंतर त्यांनी गाडी धारावी येथे नेण्यास सांगितले. परंतु धारावी पुलावर नेऊन त्यांनी शेख यांचे हातपाय बांधून त्यांना गाडीतच डांबून ठेवले.
दरम्यान, दुसऱ्या आरोपीने गाडी फोर्ट येथे नेली. येथील बॅक ऑफ बिकानेर मधील एटीएममधून शेख यांच्या दोन एटीएम कार्डांद्वारे ५० हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी दुसरा आरोपी शेख यांच्यावर लक्ष ठेवून होता. रात्री दहाच्या सुमारास सुटका करवून घेत माता रमाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नेमकी त्याच वेळेस आरोपींनी अन्य एका ठिकाणांहून वीस हजार रुपये काढल्याचा मेसेज शेख यांच्या मोबाईलवर आला. आरोपींनी ज्या पिस्तुलाने शेख यांना धमकावले ते पिस्तुल पोलिसांना गाडीतच सापडले असून ते खेळण्यातील असल्याचे स्पष्ट झाले.