रबाळे एमआयडीसी येथील अमृत योग (डब्ल्यू २७९) या केमिकल कंपनीत आज दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की, आगीच्या धुरीचे लोट मुलुंड विक्रोळी ते विटावापर्यंत दिसत होते. तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमांनतर अग्निशमन दलांच्या जवानांना आग विझविण्यात यश आले. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील अनर्थ टळला.
कंपनीत मोठय़ा प्रमाणात केमिकलचा साठा होता. आगीत केमिकलच्या ड्रमने पेट घेतल्याने त्यांचा विस्फोट होऊन आग मोठय़ा प्रमाणात इतरत्र पसरली होती. आगीची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलासह एमआयडीसी, ठाणे, मुंबई, सिडको, कल्याण डोंबिवली, लुब्रीझोल कंपनी येथून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे १२ बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत अमृत कंपनीतील दोन कामगार भाजले गेले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.
अमृत योग कंपनीत लागलेली ही आग शेजारच्या दोन कंपन्यांमध्येदेखील पसरली. त्यामध्ये या कंपन्यांचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. आसपासच्या बहुतेक कंपन्यांमध्ये केमिकलचा साठा असल्याने रबाळे एमआयडीसी पोलिसांनी वेळीच प्रसंगावधानता राखून तेथील केमिकलचे ड्रम बाहेर काढले. मात्र आगीने पेट घेतलेले ड्रम हवेत उडून रस्त्यावर पडत होते. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी अडसर निर्माण होत होता. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
एपीएमसीतील ग्रोमा भवनमध्ये आग
एपीएमसीतील मार्केटमधील माथाडी भवनाच्या मागील असणाऱ्या बाजूस ग्रोमा भवनमध्ये आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. ग्रोमा भवन हे व्यापारीवर्गाचे मध्यवर्ती कार्यालय आहे.  घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.