मुंबई महानगरपालिकेने केलेले सगळे दावे फोल ठरले असून पहिल्याच पावसात मुंबई ‘जलमय’ झाल्याचे चित्र दिसत आहे. कालपासून (रविवार) कोसळणा-या पावसाने सोमवारीही आपला जोर कायम ठेवत मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा कोलमडल्यानंतर रस्तेही जलमय झाल्याचे दिसत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूकही मंदावली असून पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने पुढे सरकरत आहे. शहरांतील मुख्य सिग्नलवरून वाहतूक अतिशय धिम्या गतीनं पुढे सरकत आहे. कळवा ते ठाणे दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली असून कळवा पुलावर गाड्या खोळंबल्याचे चित्र आहे. मालाड, अंधेरी सब वे, बहार जंक्शन, मिलिंद नगर, हिंद माता, भायखळा, माटुंगा किंग सर्कल, लालबाग, परेल आणि ठाण्यात तीन हात नाका परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्याचा फटका वाहतुकीला आणि पादचा-यांना बसत आहे.  
पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत पण धीम्या गतीने सुरू असली तरी मध्य रेल्वेची वाहतूक ४० ते ४५ मिनिटे उशीराने सुरू आहे. जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने बहुतेक गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
मुंबईतल्या पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका बसला असून काही उड्डाणं उशीराने होत आहेत.
मुंब्रा येथील सम्राटनगरमध्ये कचरा वेचणारी तीन मुलं नाल्यात पडल्याची घटना घडली असून त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं आहे आणि दोघांचा शोध सुरू असल्याचे एका वाहिनीचे वृत्त आहे.  
सांताक्रुझ वेधशाळेत ११३ मिमी, कुलाबा ७० मिमी, नवी मुंबई परिसरात ४३ मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. कल्याण शहरातही रात्री १२ ते सकाळी ९ वाजेपर्यंत १०८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.