कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान दुर्घटना; मृत नाशिकचे
मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला आणि विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेत शुक्रवारी लोकलच्या धडकेत चार गँगमनचा मृत्यू झाला. रात्रभर रेल्वे रुळांच्या दुरुस्तींचे काम पूर्ण केल्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास कर्जतहून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या भरधाव लोकलने या कामगारांना जोरदार धडक दिली. यात गोकुळ कोकळे (वय १८), श्रावणभाऊ वारणे (वय १८), काशिनाथ भाले (१९) आणि नाना सावंत (वय २७ ) या चारही गँगमनचा मृत्यू झाला. मात्र या घटनेनंतर ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’च्या आणि रेल्वेच्या एकाही अधिकाऱ्याने मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची तसदी न घेतल्याने सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या हार्बर मार्गावरील बारा डब्यांच्या लोकल यार्डाचे काम ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’कडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी हे कंत्राटी कामगार नाशिकहून आले होते. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास डॉकयार्ड रोड स्थानकाजवळील रेल्वे रुळाचे काम संपल्यानंतर या कामगारांनी सँडहर्स्ट रोड स्थानकातून कुल्र्याला जाण्यासाठी लोकल पकडली.
यानंतर कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून ते अप धीम्या मार्गावरून विद्याविहारच्या दिशेला असणाऱ्या तात्पुरता निवाऱ्याकडे विश्रांतीसाठी निघाले होते. सकाळी सहा-सव्वा सहाच्या सुमारास एकाचवेळी दोन्ही दिशेला आलेल्या भरधाव लोकलचा अंदाज न आल्याने त्यांचा गोंधळ उडाला. यात या चारही कामगारांना धावत्या लोकलने धडक दिली. त्यात हे चारही कामगार जखमी झाले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डोक्याला जोरदार मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृत झालेले कामगार नाशिकच्या इगतपुरी कुरुमवाडी गावचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई व विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी कंत्राटदार आणि रेल्वेची आहे. ही मदत न मिळाल्यास त्यांचे पडसाद उमटतील, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव सफदार सिद्दिकी यांनी सांगितले.