प्राप्तिकर खात्याकडूनच इन्कार; महेश शहाची कसून चौकशी

तब्बल १३ हजार ६८० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर करून गूढरित्या बेपत्ता झालेला अहमदाबादमधील व्यापारी महेश शहा आणि मुंबईच्या वांद्रे भागात राहणाऱ्या कुटुंबाने जाहीर केलेली दोन लाख कोटी रुपयांची संपत्ती.. या दोन्ही संपत्ती घोषणांमध्ये काही तथ्य नसल्याचे प्राप्तिकर खात्यातर्फे रविवारी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, महेश शहा याची शनिवारी रात्रभर कसून चौकशी करून रविवारी त्याला सोडून देण्यात आले.

प्राप्तिकर खात्यातर्फे राबविण्यात आलेल्या संपत्ती जाहीर करण्याच्या योजनेदरम्यान महेश शहा याने त्याच्याकडे १३ हजार ६८० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. तर वांद्रे येथील एका कुटुंबाने त्यांच्या नावे दोन लाख कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. संपत्ती जाहीर झाल्यानंतर महेश शहा संशयास्पदरित्या गायब झाला होता.

संपत्तीच्या दोन्ही घोषणा संशयास्पद असल्याचे आणि त्या कमी मिळकतीच्या लोकांनी दाखल केल्या असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही त्या त्या रेकॉर्डवर घेतल्या नाहीत. या घोषणांमागील हेतू निश्चित करण्यासाठी संपत्ती जाहीर करणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे प्राप्तिकर खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

संपत्तीच्या दोन्ही घोषणा संशयास्पद असल्याचे आणि त्या कमी मिळकतीच्या लोकांनी दाखल केल्या असल्याचे लक्षात आल्यानंतर खात्याने त्या रेकॉर्डवर घेतल्या नाहीत. या घोषणांमागील हेतू निश्चित करण्यासाठी त्या करणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे –  प्राप्तिकर खाते