वीज असो की रस्ते, पूल विकासाच्या मुद्दय़ांवर ‘गुजरात पॅटर्न’चा गाजावाजा असताना वीज वितरण क्षेत्रातील फ्रँचायजीकरणासाठी ‘महावितरण’ने भिवंडीत राबविलेल्या यशस्वी प्रयोगापासून प्रोत्साहन घेत फ्रँचायजीकरणाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवण्याचा गुजरातचा विचार आहे. प्रचंड वीजचोरी आणि अत्यल्प वीजदेयक वसुलीच्या प्रश्नावर उतारा काढण्यासाठी ‘महावितरण’ने राज्यात वीज वितरण क्षेत्रात फ्रँचायजी नेमण्याची योजना राबवली. भिवंडी शहरात वीजचोरी प्रचंड होती व वीजदेयक भरण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. २६ जानेवारी २००७ रोजी ‘महावितरण’ने भिवंडीतील वीज वितरणासाठी ‘टोरंट पॉवर लि.’ला फ्रँचायजी म्हणून नेमले. तो प्रयोग यशस्वी ठरला. हळूहळू वीजचोरी कमी झाली आणि वीजदेयक वसुली वाढली. देशात या प्रयोगाचे कौतुक झाले.
याच फ्रँचायजीकरणाच्या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी पश्चिम गुजरात वीज कंपनीचे मुख्य अभियंता जी. बी. पारेख यांच्या नेतृत्वाखालील चमूने भिवंडीचा दौरा केला. प्रत्यक्ष पाहणी करून ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ‘महावितरण’चे संचालक (वित्त) दत्तात्रय वाव्हळ यांनी या पथकाशी संवाद साधला. या फ्रँचायजीकरणाचे गुजरातच्या पथकाला कौतुक वाटले. फ्रँचायजीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राने राबवलेला पॅटर्न लक्षणीय असून भविष्यात गुजरातमध्येही तो पॅटर्न राबवण्याचा विचार सुरू असल्याचे पारेख यांनी सांगितले.
विकासाच्या त्यातही पायाभूत सुविधा क्षेत्रात आणि वीज क्षेत्रात गुजरातने साध्य केलेल्या प्रगतीचे नेहमी कौतुक होत असते. अशावेळी गुजरातसारख्या राज्याने वीज वितरणातील फ्रँचायजीकरणासाठी ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवण्यासाठी दाखवलेला रस हा महाराष्ट्राच्या वीज वितरण क्षेत्रात सुरू असलेल्या कामाला मिळालेली पावती ठरते.