लोअर परळ येथील भूखंडाचा बाजारभाव नायगावपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तेथे म्हाडा आणि पालिकेला प्रत्येकी एक तृतीयाश भूखंड देण्याऐवजी नायगावच्या स्प्रिंग मिलमध्ये एकूण ६६. ६५१ हजार चौरस मीटर भूखंड देण्याच्या बॉम्बे डाइंगच्या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.  
दरम्यान, बाजारभावाच्या पाश्र्वभूमीवर कंपनीने हा प्रस्ताव ठेवल्याने त्यानुसार अतिरिक्त जागा देण्याची आणि ही अतिरिक्त जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठीच राखून ठेवण्याची कामगारांची मागणी मात्र न्यायालयाने या वेळी फेटाळून लावली. प्रस्तावानुसार कंपनीकडून वडाळा येथे दिल्या जाणारी जागा ही म्हाडाच्या अखत्यारीत असणार असून तिचा उपयोग कशासाठी करायचा हे ठरविण्याचा अधिकार त्यांनाच असल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने कामगारांना दिलासा
देण्यास नकार दिला.
वडाळा येथील स्प्रिंग मिल आणि लोअर परळ येथील टेक्स्टाईल मिलच्या जमिनीपैकी एक तृतीयांश जमीन म्हाडा, तर एक तृतीयांश पालिकेला देण्याचे आदेश आधी उच्च व नंतर सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बे डाइंगला दिले आहेत. मात्र स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी नियमांचा चुकीचा अर्थ लावून या दोन्ही यंत्रणांच्या पदरात कमी जमीन टाकण्याचा डाव कंपनीने आखला आहे. त्याचमुळे दोन्ही मिलची प्रत्येकी एक तृतीयांश जमीन म्हाडा आणि पालिकेला देण्याऐवजी वडाळा येथील मिलचीच संपूर्ण जागा देण्याचा आणि त्या मोबदल्यात लोअर परळ येथील जमीन आपल्याकडे ठेवण्याचा नवा प्रस्ताव बॉम्बे डाइंगने उच्च न्यायालयात सादर केला.