हार्बर मार्गावरील वाहतूक मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीतच राहिली. मस्जिद व सीएसटी या स्थानकांदरम्यान मंगळवारी ओव्हरहेड वायर तुटली आणि मध्य रेल्वे प्रशासनाचा  गैरकारभार समोर आला. या तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल अडीच तास बंद होती.
सोमवारी हार्बर मार्गावर मस्जिदजवळ ओव्हरहेड वायरच्या इन्सुलेटरमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक दीड ते दोन तास ठप्प होती. सोमवारी रात्री विशेष ब्लॉक घेऊन हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र मंगळवारी सकाळी ११.५५च्या सुमारास नेमक्या याच ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटली आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम १२.१० वाजता हाती घेण्यात आले. हे काम तब्बल दोन तास चालले.
या दरम्यान हार्बर मार्गावरील गाडय़ा वडाळा आणि मानखुर्द या स्थानकांदरम्यानच चालवल्या जात होत्या. तर काही काळाने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून हार्बर मार्गावरील गाडय़ा सोडण्यात आल्या. अखेर दुपारी अडीच वाजता हा मार्ग पूर्ववत झाला. मात्र या मार्गावरील सेवा एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. अनेक प्रवाशांना पाऊण ते एक तास ट्रेनमध्येच थांबावे लागले. या दरम्यान ५४ सेवा रद्द करण्यात आल्या. तर काही सेवा मध्येच खंडित करण्यात आल्या. या बिघाडाचा परिणाम मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाच्या वाहतुकीवरही झाला. मुख्य मार्गावरील वाहतूकही १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती.