मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर येत्या रविवारी होणाऱ्या डीसी-एसी विद्युत प्रवाह परिवर्तनानंतर या मार्गावरील प्रवाशांना त्याचा कितपत फायदा मिळेल, याबाबत साशंकता असली, तरी या परिवर्तनाचा फायदा हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना होणार आहे.
   मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतूक एसी विद्युत प्रवाहावर धावायला लागल्यावर या मार्गावरील डीसी विद्युत प्रवाहावरील गाडय़ा मुख्य मार्गाच्या सेवेतून बाजूला करण्यात येणार आहेत. या गाडय़ांपैकी काही गाडय़ा हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील बारा फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
येत्या रविवारी मध्य रेल्वेवर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुंब्रा धिम्या मार्गावर आणि जलद मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे यांदरम्यान डीसी-एसी परिवर्तन होणार आहे. या परिवर्तनानंतर सध्या या मार्गावर ठाण्यापर्यंत चालणाऱ्या नऊ डीसी गाडय़ा रद्दबातल होणार आहेत. या नऊ गाडय़ांपैकी प्रत्येकी एक एक गाडी हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे, असे मध्य रेल्वेच्या परिचालन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या दोन गाडय़ा परिवर्तनानंतर लगेचच हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार नसून त्यासाठी थोडा वेळ लागेल, असेही हा अधिकारी म्हणाला. म्हणजेच सप्टेंबर महिन्याशिवाय या मार्गावरील सेवा वाढण्याची शक्यता नाही.