गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई हे मनमानी पद्धतीने वागत असून अशा अधिकाऱ्याची मला गरज नाही. असल्या सचिवांशिवाय गृहनिर्माण विभागाचा कारभार मंत्री म्हणून मी सक्षमपणे चालवू शकतो, अशा शब्दात गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी आपली नाराजी व्यक्त केली.
नव्या सरकारच्या स्थापनेनंतर प्रत्येक विभागाचे सचिव हे संबंधित खात्याच्या मंत्र्यांची सदिच्छा भेट घेतात. खात्याविषयी तसेच योजनांबाबत माहिती देतात. मंत्र्यांची तसेच शासनाच्या भूमिका समजून घेऊन त्यानुसार धोरण आखण्यात व राबविण्यात मदत करतात. परंतु गवई यांना याची कल्पना नसावी. मी मंत्री झाल्यापासून आजपर्यंत ते एकदाही मला भेटायला आले नाहीत, असे मेहता म्हणाले.
धोरण निश्चिती आणि अंमलबजावणीत प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असते. तथापि आमच्या सचिवांकडे मंत्र्यांना भेटण्यासाठी साधा वेळ नाही. एवढेच नव्हे तर वीस दिवसांच्या रजेवर जाताना कळविण्याचे साधे सौजन्यही त्यांनी दाखवलेले नाही. २ ते २२ मे या कालावधीसाठी गवई हे रजेवर निघून गेले असून त्यांच्या असण्या-नसण्यामुळे विभागाला काहीही फरक पडत नाही, असा टोलाही प्रकाश मेहता यांनी हाणला.
अशी व्यक्ती गृहनिर्माण विभागात नसली तरी सरकारचे कोणतेही काम अडणार नाही. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझे धोरण मीच निश्चित करणार तसेच त्यासाठीचा प्रस्ताव व सादरीकरणही यापुढे सचिवांकडून करवून न घेता मंत्री म्हणून मी स्वत: करणार असे सांगून लोकाभिमुख सरकार लोकांसाठी कसे काम करते हे दाखवून देईन, असेही प्रकाश मेहता म्हणाले.