सर्व प्रमुख म्होरके गजाआड झाल्याने ‘इंडियन मुजाहिद्दिन’ने आता आपला चेहरामोहरा बदलण्याचे ठरविले आहे. तपास यंत्रणेला चकमा देण्यासाठी इंडियन मुजाहिद्दिनने ‘उसाबा’ हे नाव धारण करून कारवाया सुरू ठेवल्याचा तसेच केरळ, बिहारमधून गाशा गुंडाळून नेपाळमध्ये या संघटनेने बस्तान बसविले असावे, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘जिहादसाठी वाट्टेल ते’, असे घोषवाक्य घेऊन सुरुवातीला ‘स्टुडन्टस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ म्हणजेच सिमीने दहशतवादी कारवाया दोन दशकांपूर्वी सुरू केल्या. औरंगाबाद येथून मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने मोठय़ा प्रमाणात स्फोटके हस्तगत केल्यानंतर ते स्पष्ट झाले होते. मुंबईजवळ पडघा येथेही सुसज्ज असे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले होते. परंतु ते उद्ध्वस्त करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. त्यानंतर त्यांनी पुण्यात आपले बस्तान बसविले. मात्र सिमीवर बंदी आल्यानंतर त्यातील ‘इस्लामिक मुव्हमेंट’चा आयएम कायम ठेवत या संघटनेने इंडियन मुजाहिद्दीन हे नाव धारण केले. आता हे नावही तपास यंत्रणेच्या तोंडावर आल्याने पुन्हा नवे नाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यानुसार उसाबा या नावाने कारवाया सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उसाबा हा अरेबिक शब्द असून त्याचा अर्थ एक गट विशिष्ट ध्येयासाठी एकत्र आणणे. या नावाने इंडियन मुजाहिद्दिनने कारवाया केल्या आहेत की नाही, याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून दुजोरा मिळू शकला नाही. मात्र नेपाळमधून मुजाहिद्दीनच्या कारवाया मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिला.