मुंबई शहर आणि लगतच्या शहरांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील भातसा, वैतरणा आणि तानसा या धरणांसाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या, त्या प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने प्रकल्पग्रस्त धोरणांतर्गत मुंबई महापालिकेने सेवेत सामावून घ्यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भातसा, वैतरणा व तानसा ही धरणे तयार होऊन बराच कालावधी लोटला असला तरी अनेक प्रकल्पग्रस्तांना महापालिकेने नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलेले नाही; तसेच ज्या गावांमधून जलवाहिनी जाते तेथे पिण्याचे पाणी देण्याची टाळाटाळ होत आल्याबाबतचा प्रश्न आमदार रुपेश म्हात्रे यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला तर पिढी बदलली तरी अद्यापि प्रकल्पग्रस्तांना मुंबई महापालिकेने नोकऱ्या दिलेल्या नाहीत याकडे लक्ष वेधत प्राधान्याने नोकऱ्या देण्याचे आदेश मुख्यमंत्री देणार का, असा सवाल आमदार योगेश सागर यांनी केला.
ज्या गावांमधील जमीन पाइपलाइनसाठी वापरण्यात आली आहे तेथे पिण्याचे पाणी पालिकेने कमी दराने दिले आहे. तसेच महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने नोकऱ्यांमध्ये सामावून घ्यावे असे आदेश पालिकेला दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.