गणरायाला पयलं नमन करण्यासाठी कोकणातल्या आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांना सुखद धक्का देण्यासाठी मध्य रेल्वे ‘वातानुकूलित डबल डेकर गाडी’ चालवण्याच्या तयारीत असली तरी प्रत्यक्षात या गाडीची अवस्था पाहता चाकरमान्यांना वेगळाच धक्का बसणार आहे. आरडीएसओ आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या परवानगीची वाट पाहत सध्या नाहूर आणि मुलुंड या स्थानकांदरम्यान उभ्या असलेल्या या गाडीची ‘सजावट’ दणक्यात सुरू आहे. या सजावटीचे ‘कंत्राट’ कुणालाही दिले नसून आगंतुक लोक आपल्या परीने गाडी ‘सजवत’ आहेत. गाडीच्या काचांवर तडय़ांची नक्षी उमटली असून पावसाच्या वाढत्या जोराबरोबर आजूबाजूला वाढलेल्या वेलीही गाडीच्या दरवाज्यांवर महिरप घालत आहेत. मात्र गाडीच्या या ‘सजावटी’कडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे.
दीड महिन्यांपूर्वी मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावर या डबल डेकर गाडीची चाचणी आरडीएसओने घेतली होती. या चाचणीदरम्यानच गाडीच्या काही खिडक्यांच्या काचांना तडे गेले होते. तेथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चिकटपट्टय़ा लावल्या. त्यानंतर ही गाडी काही काळ लोकमान्य टिळक टर्मिनस येथे उभी करण्यात आली. गेला महिनाभर ही गाडी नाहूर आणि मुलुंड या स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या पलीकडे उभी करून ठेवली आहे.
गाडीची अवस्था
रेल्वे अधिकाऱ्यांनी चिकटपट्टीने झाकलेल्या तडय़ांशिवायही अनेक मोठे तडे या गाडीच्या काचांना पडले आहेत. एका दरवाजाचे हँडलही तुटलेले आहे.

“लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ही गाडी उभी करण्यास जागा नाही. इतर कुठेही ही गाडी उभी केली तरी समाजकंटकांना आवर घालणे कठीण आहे.”
नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी
*एका डब्यात पाण्याची बाटली, खाद्यपदार्थाचा छोटा डबा आणि खाण्याच्या टेबलावर पसरलेले खरकटेही आढळून आले.