मनसेच्या मागणीवर आयुक्तांचे सकारात्मक आश्वासन
अनेकदा परदेशी कलाकार वर्क परमिटशिवाय हिंदी सिनेमांसाठी कामे करतात, परदेशातून आलेल्या कलाकारांचा कुठलाही माग ठेवण्यात येत नाही, त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेलाही धोका पोहोचू शकतो, त्यामुळे अशा कलाकारांविषयी र्सवकष पोलीस धोरण आखण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने केली आहे. चित्रीकरणासाठी आलेले परदेशी कलाकार ज्या हॉटेलांमध्ये उतरतात, त्याची माहिती पोलिसांच्या विशेष शाखेला कळवायची असते पण, नागरिकांविषयी माहिती न कळविल्याने व्हिसा पडताळणी होत नाही, याचे अधिकार स्थानिक पोलिसांना देण्याची मागणीही मनसेने पोलिसांकडे बुधवारी केली.
मागील आठवडय़ात जॉन अब्राहमच्या फोर्स-२ या चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी झालेल्या परदेशी कलाकारांच्या व्हिसावरून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने चित्रीकरण बंद पाडले होते.
त्याविषयी सेनेच्या कार्यध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी बुधवारी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेतली. पर्यटन व्हिसावर आलेले परदेशी नागरिक चित्रपटांचे चित्रीकरण करतात, त्यांच्या व्हिसाविषयी पोलिसांच्या विशेष शाखेला कळविणे गरजेचे असूनही पोलिसांचा तगादा नको म्हणून अनेकदा हॉटेल व्यवस्थापन ती माहिती पोलिसांना कळवत नाही, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. ज्या ठिकाणी सिनेमाचे चित्रीकरण होणार आहे तिथेच कलाकारांच्या व्हिसाची पडताळणी स्थानिक पोलीस ठाण्याकडूनच व्हावी, त्यामुळे चित्रपटकर्त्यांना आणि पोलिसांनाही त्रास होणार नाही. तसेच, राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या चित्रपट कर्मचारी संघटनांची खंडणीखोरीही बंद होईल, याकडेही ठाकरे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. यावर आयुक्त पडसलगीकर यांनी धोरण तयार करण्याचे आश्वासन दिल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले आहे.