‘भयग्रस्त समाजाला नेहमी पुढे जाण्यासाठी कोणी तरी ‘नायक’ हवा असतो. कोणत्या तरी तारणहार, मसीहा यांची वाट पाहण्यापेक्षा आपणच आपल्या आयुष्याचे नायक बनले पाहिजे,’ हा विचार मांडल्यानंतर समोर बसलेल्या परीक्षकांनाही त्या तरुण वक्त्याचे बोलणे आवडले नसते तरच नवल. जागतिकीकरणाच्या रेटय़ात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना ऐकायला छान वाटत असली तरी हे विश्व एकाच राष्ट्राप्रमाणे चालवणे हे किती अव्यहार्य आहे, यासारखी अभ्यासपूर्ण मांडणी असलेल्या विचारांनी ‘वक्ता दशसहस्रेषु’ या ‘लोकसत्ता’ आयोजित वक्तृत्व स्पर्धेची मुंबईतील प्राथमिक फेरी रंगली.
‘नाथे समूह’प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफाईस’ व ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ यांच्या सहकार्याने तसेच ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ व ‘तन्वी हर्बल’ यांच्या मदतीने पार पडलेल्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ वक्तृत्व स्पर्धेची मुंबई विभागीय प्राथमिक फेरी मंगळवारी ‘एक्स्प्रेस टॉवर’मध्ये पार पडली. विविध महाविद्यालयांतून ३७ स्पर्धक यात सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी, प्रा. वर्षां माळवदे आणि प्रा. अभिजित देशपांडे यांनी काम पाहिले. कधी सहज संयततेने तर कधी मला असे वाटते म्हणत मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या स्पर्धकांपैकी ७ जणांची परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवड केली. यानिमित्ताने, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकोंना मार्गदर्शन करताना कमलाकर नाडकर्णी यांनी ‘वक्तृत्व’कला विकसित करण्यासाठीची काही मूलभूत तत्त्वे समजावून सांगितली.
‘बोलणे, बडबडणे आणि व्यक्त होणे या तीनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. वक्तृत्व म्हणजे केवळ भाषणबाजी करणे नव्हे तर तुमचा जो विचार आहे तो समाजाला पटवून देता आला पाहिजे, असे नाडकर्णी यांनी सांगितले. भाषण करताना वक्त्याची उत्स्फूर्तता महत्त्वाची मानली जाते. त्याचे विचार ऐकताना ते त्याला आताच सुचले आहेत इतक्या सहजतेने मांडणी असली पाहिजे,’ असे ते म्हणाले.
‘आपल्याला नायक का लागतात’ या विषयापासून ते ‘जागतिकीकरणात देश संकल्पना किती सुसंगत’ अशा वेगवेगळ्या विषयांवर हिरिरीने आपले मुद्दे मांडणाऱ्या तरुणाईच्या वैचारिकतेचा खरा कस ‘लोकसत्ता’ आयोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या व्यासपीठावर लागला. या स्पर्धेची मुंबई विभागीय केंद्राची अंतिम फेरी ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याबाबतची माहिती ‘लोकसत्ता’मधून जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीतून मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी या सात जणांची निवड करण्यात आली
गौरी केळकर, श्रेयस मेहेंदळे, प्रियांका अर्जुन तुपे, संजय व्ही. दाभोळकर, वेदवती चिपळूणकर, प्रणव पटवर्धन, गौरांगी लळीत

विचार आपले असावेत
वक्तृत्व स्पर्धेतील विषयांवर आपले विचार मांडताना ते विचार खरोखरच आपले असले पाहिजेत. केवळ कु णा तरी मार्गदर्शकाचा, शिक्षकाचा विचार घेऊन मांडणी केली तर तुमचे भाषण खुंटते. स्पर्धकांनी स्वत: अभ्यास करून विचार मांडले पाहिजेत,  स्वत:ची शैली विकसित केली पाहिजे. शिवाय, भाषणात वापरण्यात येणारे थोर व्यक्तींचे विधान आपल्या मूळ विचारांशी किती सुसंगत आहे हे दहादा तपासून पाहिले पाहिजे. स्पर्धकांनी अशा पद्धतीने वक्तृत्व कला विकसित केली तर स्पर्धेला अधिक रंगत येईल.
    – प्रा. वर्षां माळवदे

विद्यार्थ्यांसाठी विचारमंच
वक्ता हा संवादक असतो. तो प्रत्येकाशी सर्वागाने संवाद साधत असतो, हे स्पर्धकांनी लक्षात घेतले पाहिजे. या स्पर्धेत सहभागी झालेले तरुण वक्ते तयारीत थोडे कमी पडले. मात्र, त्यांनी ‘लोकसत्ता’च्या मोठय़ा मंचावर येऊन बोलण्याच
ा प्रयत्न केला हे कौतुकास्पद आहे. ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ ही स्पर्धा राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी विचारमंच ठरेल.
 – प्राध्यापक अभिजित देशपांडे