कोकणातील सिंधुदुर्गात पहिला साखर कारखाना सुरु करण्यासाठी सर्व राजकीय अडचणींवर मात करून काँग्रेस आमदार विजय सावंत यांनी अखेर सर्व परवानग्या मिळविल्या आहेत. सिंधुदुर्गातील वजनदार काँग्रेस नेते उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर सावंत यांनी केलेली ही राजकीय मात मानली जात असून येत्या दोन वर्षांंत  कारखान्याची उभारणीही पूर्ण होणार आहे. भरपूर पाणी उपलब्ध असलेल्या कोकणात ऊस लागवड करण्यास या कारखान्यामुळे चालना मिळून साखर निर्मितीचे युग सुरु होणार आहे. हा कारखाना आमदार सावंत यांचा खासगी मालकीचा असला तरी त्यातील ४० टक्के समभाग शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.
सावंत हे गेले काही महिने साखर कारखान्याला आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. राज्य शासनातील अनेक खाती व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांची अनुकूल भूमिका होती. पण तरीही जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, साखर आयुक्त यांनी अनेक परवाने प्रलंबित ठेवले होते. त्यामुळे सावंत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने शासनाला आदेश दिले आणि हे परवाने मिळाले. केंद्र सरकारचीही मान्यता मिळाली असल्याचे सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्गातील वजनदार राजकीय नेत्याने विरोधासाठी जंग जंग पछाडूनही उपयोग झाला नाही. सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर त्यांनी दबाव आणला होता व परवाने थांबविले होते. आता सर्व अडथळे दूर झाल्याचे सावंत यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले.  कोकणात पाऊस भरपूर पडतो, तरी तेथे ऊस लागवड कमी आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि पाण्याची कमतरता असलेल्या मराठवाडय़ातही ऊस पिकतो. पण कोकणात आता बदल होऊ लागला असून सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुमारे एक लाख एकर क्षेत्रात ऊस पिकतो. हा ऊस गगनबावडा येथील डॉ.डी.वाय. पाटील साखर कारखान्याला जातो. पण घाट पार करून ऊसाची वाहतूक करणे जिकिरीचे असून त्या कारखान्याकडून वेळेवर शेतकऱ्यांना पैसेही मिळत नसल्याची तक्रार आहे. आपल्या कारखान्यासाठी सुमारे तीन लाख एकर ऊस आवश्यक असून पुढील दोन वर्षांत त्याची लागवड वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सध्या कोकणात एकरी ३५ ते ४० टन ऊसाचे उत्पादन मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. सध्या या जमिनीत भाताची लागवड असून त्यातील उत्पन्न खूप कमी आहे. त्यांना ऊसाची लागवड करण्यासाठी उद्युक्त केले जाईल. देवघर धरणाचे काम पूर्ण होऊन काही वर्षे होऊनही कालवे काढलेले नाहीत. ते काम मार्गी लावणार असून त्यामुळे सुमारे १२ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येईल. त्यामुळे कारखान्यासाठी ऊसाची अडचण येणार नाही, अशी माहिती सावंत यांनी दिली.

नक्की काय होणार?
भरपूर पाणी उपलब्ध असलेल्या कोकणात ऊस लागवड करण्यास या कारखान्यामुळे चालना मिळून साखर निर्मितीचे युग सुरु होणार आहे. हा कारखाना आमदार सावंत यांचा खासगी मालकीचा असला तरी त्यातील ४० टक्के समभाग शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.