फारशी वर्दळ नसलेल्या आणि सुस्थितीत असतानाही कोटय़वधी रुपये खर्च करून वरळीतील रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचा रस्ते विभागाने घातलेला घाट दस्तुरखुद्द पालिका आयुक्तांनीच उधळून लावला आहे. महापौरांनी रस्ते विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करताच पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सोमवारी काही रस्त्यांची पाहणी करून वरळीमधील बी. जी. खेर मार्गाच्या पुनर्बाधणीचे काम रद्द केले. त्यामुळे करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत कररूपात जमा केलेल्या ८.१७ कोटी रुपयांचा अपव्यय टळला असून, आयुक्तांच्या या निर्णयामुळे रस्ते विभागातील अधिकाऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे.
नालेसफाईबरोबर रस्ते विभागाच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करीत महापौर स्नेहल आंबेकर यांनी रॅबीट वाहून नेण्याच्या कामात घोटाळे होत असून, त्याची चौकशी करण्याची मागणी अजय मेहता यांना पत्र पाठवून केली आहे. या पत्राच्या पाश्र्वभूमीवर अजय मेहता यांनी सोमवारी वरळी, प्रभादेवी आणि दादर परिसरातील काही रस्त्यांची पाहणी केली. पाहणी केलेल्या रस्त्यांच्या बांधणीचे काम हाती घेण्यात येणार असून, ही कामे कंत्राटदारांना देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयुक्तांनी पाहणी केलेल्या रस्त्यांमध्ये एम. के. संघवी मार्ग, जे. बी. टेमकर मार्ग, प्र. के. अत्रे मार्ग, बी. जी. खेर मार्ग, वरदराज आद्य मार्ग, आर. के. वैद्य मार्ग, न. चिं. केळकर मार्ग आदींचा समावेश होता.
पेवर ब्लॉकपासून तयार करण्यात आलेल्या बी. जी. खेर मार्गाची गुणवत्ता उत्तम असल्याचे आणि तेथे फारशी वर्दळ नसल्याचे पाहणी दौऱ्यात आजय मेहता यांच्या निदर्शनास आले. असे असतानाही रस्ते विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बी. जी. खेर मार्गावर तब्बल ८ कोटी १७ लाख रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार होते. या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु हा रस्ता सुस्थितीत असल्याने आणि तेथे फारशी वर्दळ नसल्याने त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण न करण्याचा निर्णय अजय मेहता यांनी घेतला आहे.